Restrictions on air travel between Ukraine and India lifted from today
युक्रेन आणि भारतादरम्यानच्या विमान वाहतूकीवर लावलेले प्रतिबंध आजपासून मागे
युक्रेन आणि भारतादरम्यानच्या विमान वाहतूकीवर लावलेले प्रतिबंध हवाई वाहतूक मंत्रालयानं आजपासून मागे घेतले आहेत. दोन्ही देशांदरम्यान सर्व प्रकारच्या हवाई वाहतुकीला परवानगी दिल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे.
दरम्यान, रशियाच्या दबावाला न जुमानता आज युक्रेननं राष्ट्रध्वज फडकवून एकतेचे प्रदर्शन केलं. क्रेमलिन जाहीरनाम्यानुसार रशियानं सैन्य माघारी घेण्याची घोषणा करूनही याबाबत अजून कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे पश्चिमी राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली आहे. रशियानं युक्रेनच्या सीमा ओलांडल्या नसली तरीही अजून धोका टळलेला नाही, असं अमेरिका आणि सहयोगी राष्ट्रांचं मत आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या संकटाचं शांतीपूर्ण निराकरण करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका याप्रश्नी मुत्सद्दी उपायांना प्राधान्य देईल असं अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. रशियानं युक्रेनच्या सीमांवर सैन्य तैनात केल्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.