Role of science and research important for the future of the country
देशाच्या भविष्यासाठी विज्ञान आणि संशोधनाची भूमिका महत्त्वपूर्ण – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एम आय टी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (ए डी टी) विद्यापीठाचा सहावा दीक्षांत सोहळा संपन्न
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुणे येथील एम आय टी-आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (ए डी टी ) विद्यापीठाचा सहावा दीक्षांत सोहळा आज संपन्न झाला. नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्यापीठातील पी एचडी आणि सुवर्णपदकप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.
या सोहळ्यात एकूण 2805 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात 23 पीएचडी, 51 सुवर्णपदके व 188 रँक होल्डर प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. तसेच याप्रसंगी गडकरी यांच्या हस्ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार यांना भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम एक्सेलेन्स अवॉर्ड फॉर सायन्स पुरस्काराने गौरवण्यात आले. याप्रसंगी, माईर्स एमआयटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड, एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू मंगेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नितीन गडकरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ए. एस. किरण कुमार यांना ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने पुरस्कार मिळणं ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत विज्ञानाच्या क्षेत्रात देशात खूप मोठे काम झाले आहे. हे काम आणखी पुढे नेण्यासाठी विज्ञान आणि संशोधनात जास्त काम व्हायला हवे. हे संशोधन लोकांच्या गरजांचा विचार करून तसेच क्षेत्रनिहाय झाल्यास यामध्ये जास्त यश मिळू शकतं, असे गडकरी म्हणाले.
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, देशाचा विकास सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी गावांचा विकास होणे आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सुमारे 90 टक्के जनता ही ग्रामीण भागात राहत होती. मात्र नंतरच्या काळात ग्रामीण भागात फारसा विकास न झाल्यामुळे येथील जवळपास 30 टक्के नागरिकांचे शहरी भागात स्थलांतर झाले. हे स्थलांतर थांबवण्यासाठी विज्ञान आणि संशोधन यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरू शकते.
इस्रोचे माजी अध्यक्ष एस. वाय. किरणकुमार म्हणाले की हा केवळ माझा सन्मान नाही, तर हा संपूर्ण संस्थेचा सन्मान आहे. चंद्रयान मोहिमेचा उल्लेख करताना ते पुढे म्हणाले की इस्रोने अतिशय कमी संसाधनांचा वापर करून बिकट परिस्थितीत हे यश प्राप्त केले आहे. अशी कामगिरी करणे आजपर्यंत कोणत्याच देशाला शक्य झाले नव्हते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “देशाच्या भविष्यासाठी विज्ञान आणि संशोधनाची भूमिका महत्त्वपूर्ण”