Sachin Tendulkar will ‘batting’ to increase voter turnout
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सचिन करणार ‘बॅटिंग’
क्रिकेटचा देव मानले जाणारे, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आज भारतीय निवडणूक आयोगाचे नॅशनल आयकॉन म्हणून आपली सेकंड इनिंग्ज केली सुरू, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सचिन करणार ‘बॅटिंग’
“मैदानावर टीम इंडिया साठी धडधडणारी हृदये, आता त्याच आत्मीयतेने मतदान जागृतीसाठी तत्पर होऊन, देशाच्या लोकशाहीला विजयी बनवतील ”- सचिन तेंडुलकर
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृती करणारा ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून सचिन तेंडुलकर आदर्श व्यक्ती: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
नवी दिल्ली : क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी आज आपल्या कारकीर्दीची दुसरी इनिंग्ज सुरु केली. भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ म्हणजेच राष्ट्रीय आदर्श म्हणून मतदार जागृती आणि शिक्षण करण्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्या नावाची आज घोषणा करण्यात आली. नवी दिल्लीत आकाशवाणी रंगभवन इथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात आज निवडणूक आयोगाने तेंडुलकर यांच्यासोबत यासाठी तीन वर्षांचा करार केला आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे आणि अरुण गोयल उपस्थित होते. ह्या करारामुळे, तेंडुलकर यांच्या अद्वितीय प्रभावाचा उपयोग भारतातील युवाशक्तीला जागृत करण्यासाठी, मतदार म्हणून पुढच्या, विशेषतः लोकसभा निवडणूकीत युवकांचा टक्का वाढवण्यासाठी होऊ शकेल. ह्या भागीदारीचा उद्देश, नागरिक, विशेषत: युवक व शहरी नागरिक आणि निवडणूक प्रक्रियेतील अंतर भरुन काढणे हा असून, त्याद्वारे शहरी क्षेत्र आणि युवकांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी असलेली अनास्था दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
नॅशनल आयकॉन म्हणून आपल्या नव्या भूमिकेविषयी बोलतांना सचिन तेंडुलकर यांनी या कार्याबद्दलची कटिबद्धता आणि उत्साहाची भावना व्यक्त केली. भारतासारख्या चैतन्यमय लोकशाहीसाठी राष्ट्रबांधणीत युवकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. भारतीय संघाच्या क्रिकेट सामन्यादरम्यान, एकमुखाने, एकदिलाने धडधड करणारी, ‘इंडिया इंडिया’ चा जयघोष करणारी युवा मने, आता, तशाच एकदिलाने भारताची मौल्यवान लोकशाही यशस्वी करण्यासाठी एकत्र येऊन धडधडतील आणि त्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे आपला मतदानाचा हक्क नियमितपणे बजावणे.
यावेळी त्यांनी असेही सांगितले, की मैदानावर गर्दी करण्यापासून, ते आपल्या मतदान बूथ वर गर्दी करण्यात आपण तोच जोश आणि उत्साह कायम ठेवू, आपल्या टीमसाठी उभे राहण्यासाठी जसे आपण बाहेर निघतो, वेळ काढतो, तसाच उत्साह आणि जोश आपण आपल्या देशासाठी मतदान करण्यातही दाखवायला हवा. जेव्हा देशातील कानाकोपऱ्यातील युवा मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होतील, तेव्हाच आपण देशाचे उज्ज्वल भविष्य घडतांना पाहू शकू, असेही सचिन तेंडुलकर म्हणाले.
सचिन तेंडुलकर, केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर आदर्श मानले जातात आणि त्यांचा हा वारसा, त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीच्याही पलीकडचा आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावेळी म्हणाले. त्यांची उत्कृष्ट कारकीर्द ही त्यांचा सर्वोत्तम खेळ, सांघिक भावना आणि यशासाठी अथक प्रयत्नांची वचनबद्धता याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. त्यांचा प्रभाव खेळाच्या पलीकडे आहे, म्हणूनच, निवडणूक आयोगासाठी फलंदाजी करण्यासाठी आणि मतदारांची संख्या वाढवण्यासाठी ते एक आदर्श व्यक्ती आहेत, असे त्यांनी सांगितले.
या सहकार्याअंतर्गत, विविध टीव्ही टॉक शो/कार्यक्रम आणि डिजिटल मोहिमा इत्यादींमध्ये सचिन तेंडुलकर यांनी मतदार जागृतीसाठी प्रचार करणे यासह विविध उपक्रमांचा समावेश असेल. मतदानाचे महत्त्व आणि देशाचे भवितव्य घडवण्यात मतदानाची भूमिका याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवले जाणार आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सचिन करणार ‘बॅटिंग’”