After Samriddhi, Nagpur-Pune distance will also be completed in six hours
समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे- नगर-छत्रपती संभाजी नगर सहा पदरी महामार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या
दक्षिण ते उत्तर दिशांना जोडणारे महामार्ग मराठवाड्याला कवेत घेऊन पुढे जातील – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
नागपूर : समृद्धी महामार्गाच्या यशस्वी निर्मितीनंतर नागपूर येथून मुंबई येथे पोहोचणे कमालीचे सुखद आणि जलद झाले आहे. समृद्धीने संभाजीनगरला अवघ्या चार तासात जाता येते मात्र छत्रपती संभाजीनगर येथून पुणे येथे पोहोचणे अधिक आव्हानात्मक झाले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर ते पुणे या सध्या अस्तित्वात असलेल्या वाहतूकीच्या कोंडीला टाळण्यासाठी नव्या महामार्गाची नितांत गरज होती. ही गरज ओळखून आता पूणे ते छत्रपती संभाजीनगर या 230 किलोमिटर सहा पदरी ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वे ची निर्मिती करण्यासाठी सामंजस्य करार होत आहे याचा मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दोन महानगरादरम्यान नवीन एक्सप्रेस वे निर्मितीबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमवेत या एक्सप्रेसवे बाबत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, मुख्य अभियंता डी. एन. नंदनवार, उपसचिव मयुर गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील दु:ष्काळग्रस्त भाग असलेल्या बीड जिल्ह्यातील काही गावांना जोडून जात आहे. दु:ष्काळग्रस्त भागाला विकासाच्या नवीन वाटा याद्वारे मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. हा महामार्ग पुणे येथील रिंग रोडला मिळेल. पुणे येथील ज्या ठिकाणी रिंग रोडला हा रस्ता मिळणार आहे त्या रिंग रोडसाठी भूसंपादन प्रक्रीया पूर्णत्वास आली आहे. पुण्यातील रिंग रोड रस्ताही एक्सप्रेस वे चे काम पूर्ण होईपर्यंत पूर्णत: तयार असेल असे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग आता आपण गोंदिया, चंद्रपूर पर्यंत जात आहे. नागपूर-गोवा महामार्गाला आता गती दिली असून या कामासंदर्भात आवश्यक त्या नोटीस काढल्या आहेत. महाराष्ट्रातला प्रत्येक भाग महामार्गाच्या जाळ्याशी जोडला गेला पाहिजे ही आमची भूमिका असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भक्कम साथ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी काढले.
दक्षिण ते उत्तर दिशांना जोडणारे महामार्ग मराठवाड्याला कवेत घेऊन पुढे जातील – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
पुणे ते छत्रपती संभाजीनगर या सध्या असलेल्या महामार्गावर वाहनांची वर्दळ ही अनेक पटीने वाढली आहे. काही दिवसापूर्वी मी स्वत: नगर ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील ही कोंडी अनुभवली. या दोन्ही महानगरांना जलद गतीने जोडणाऱ्या एक्सप्रेस वे ची नितांत गरज होती. त्या दृष्टीनेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची निर्मिती आपण केली. सध्या असलेल्या मार्गालाही चांगले करण्याची गरज असून लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत व पूर्व पश्चिम भागांनाही जोडणारे महामार्गाचे जाळे आपण निर्माण केले आहेत. हा नवीन एक्सप्रेस वे मराठवाड्यातील काही भागाला कवेत घेऊन दक्षिण ते उत्तर दिशाशी जोडला जाईल असे त्यांनी सांगितले. सुरतपासून नाशिक मार्गे येणाऱ्या या एक्सप्रेसवेवरुन सोलापूर महामार्ग व पुढे कर्नूलमार्गे कन्याकुमारी पर्यंतचा प्रवास जलद होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “समृद्धी पाठोपाठ नागपूर-पुण्याचे अंतरही सहा तासात पूर्ण होणार”