Sanatan Dharma can solve all the questions facing humanity
सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता – राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्या हस्ते सनातन धर्माचे अमेरिकन अभ्यासक आनंद मॅथ्यूज यांच्या ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : व्यक्तिगत, सामाजिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर आज अशांती आहे. परंतु, मानवतेपुढील सर्व समस्यांचे निराकरण सनातन धर्माच्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या व्यापक शिकवणीत आहे. सनातन धर्मातील या शिकवणीचे शास्त्रशुद्ध विवेचन करुन ते युवापिढीला सांगण्याचे काम अमेरिकन लेखक आनंद मॅथ्यूज शोकी करीत असून ते कार्य महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
अमेरिकन सिनेमॅटोग्राफर व सनातन धर्माचे अभ्यासक आनंद मॅथ्यूज शोकी यांनी लिहिलेल्या ‘इन क्वेस्ट ऑफ गुरु’ या पुस्तकाचे प्रकाशन आज राज्यपाल बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आज विद्यार्थ्यांना शाळेत भौतिक ज्ञान – विज्ञान शिकवले जाते. मुलांचा बुद्ध्यांक वाढत आहे. परंतु जीवन जगण्याची कला त्यांना शिकवली जात नाही. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लोक वैयक्तिक, सामाजिक तसेच राष्ट्र स्तरावर अशांत व अस्वस्थ आहे. भारतीय तत्वज्ञानात गुरुला फार महत्व आहे. गुरुला ईश्वरापेक्षाही अधिक महत्व दिले आहे, कारण गुरूच ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात. गुरूंचा शोध हा वास्तविक स्वतःचा शोध असतो. आनंद मॅथ्यूज यांनी गुरूंचा शोध घेताना सनातन धर्माचे अनुभवसिद्ध तत्वज्ञान सोप्या भाषेत युवकांना विशद करून सांगितले आहे, असे सांगून राज्यपालांनी लेखकाचे अभिनंदन केले.
लेखक आनंद मॅथ्यूज यांनी आपल्या प्रस्तावनेतून अमेरिकेतून भारताकडे येण्याचा अध्यात्मिक प्रवास व गुरूंचा शोध याबद्दल माहिती दिली.
विश्व संवाद केंद्रातर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याला सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल जी डी बक्षी, कर्नल अशोक किणी, पुस्तकाचे लेखक आनंद मॅथ्यूज शोकी, अध्यात्मिक गुरु मोहनजी, विश्व संवाद केंद्राचे मुख्य संवाद अधिकारी निशिथ भांडारकर व निमंत्रित उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सनातन धर्मात मानवतेपुढील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची क्षमता”