Funds will be made available for Sane Guruji’s memorial
साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे थाटात उद्घाटन
गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण मिळणे मुलभूत अधिकार – साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे
उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य – उद्घाटक सुमित्रा महाजन
पुज्य साने गुरूजी साहित्य नगरीतून
जळगाव : महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान, तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती.
उपमुख्यमंत्री श्री.पवार पुढे म्हणाले की, अमळनेर मध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी जगात पोहचल्या आहेत. विप्रो कंपनी, तत्वज्ञान केंद्राचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. बहिणाबाईंनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. राज्यात वाचनसंस्कृती वाढावी. यासाठी आम्ही शासनपातळीवर प्रयत्नशील आहे. डिजिटल युगात वाचन संस्कृती बदलली आहे. वाचनसंस्कृती टिकून राहणे. ही समाजाची गरज आहे. मराठी साहित्य संमेलनास आता डिजिटल टच देण्यात आला आहे.
मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे. तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी शासनाची आहे तसी आपल्या सर्वांची आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी आज येथे व्यक्त केले.
संमेलनाध्यक्ष श्री.शोभणे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा, लेखक, धर्म, संस्कृती, परंपरा व आजच्या तरूणाईचे प्रश्न याविषयी मत मांडले. ते म्हणाले की, मराठी साहित्य व भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटक, संस्थांची जबाबदारी आहे. प्रसार माध्यमांनी ही मराठी भाषा व व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे.
मराठी साहित्य जगताचा विचार करताना नव्या पिढीकडून आशा पल्लवित होत आहेत. आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या आकृतिबंधात मांडत आपला शोध घेणारी म्हणून नवी पिढी आज काही लक्षवेधी लेखन करीत आहे. भारतीय लोकशाहीतील आधारस्तंभ असलेल्या संसद व राज्य विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात साहित्य, कलावंतांची त्यांच्या राखीव जागेवर वेळोवेळी निवड होणे गरजेचे आहे. अशी अपेक्षाही साहित्य संमेलनाध्यक्ष श्री. शोभणे यांनी व्यक्त केली.
मराठी भाषा धोरण जाहीर करणार – दीपक केसरकर
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मराठी भाषा वेगवेगळ्या राज्यात पोहचविण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळांने केले आहे. तालुकास्तरावर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी २ लाख रूपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षापासून शाळेत वाचनाचा तास सक्तीचा केला आहे. संत साहित्य संमेलनास दरवर्षी २५ लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा विभागात पुस्तकाचे गाव केले जाणार आहे.
मुंबईमध्ये शासनाच्यावतीने मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. वाई गावात मराठी विश्वकोश मंडळाची भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. मराठी युवक मंडळांना पाच हजारांचे अनुदान दिले जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्यिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.
उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य – उद्घाटक सुमित्रा महाजन
संमेलनाच्या उद्घाटक सुमित्रा महाजन म्हणाल्या की, काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना.धो.महानोर, जीवनाचे मर्म आपल्या अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले आहे. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात. तुमचं मन शुध्द असेल तर तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाहीत. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ७२ वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे, ही सर्व जळगाव वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संमेलनाचे निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, अमळनेर तालुक्याला संत सखाराम महाराजांचे आशीर्वाद लाभले आहेत. साने गूरूजींची कर्मभूमी आहे. शिक्षणाचे पंढरपूर म्हणून अमळनेराचा लौकिक आहे. अमळनेरसारख्या साहित्य नगरीत संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब आहे.
श्रीमती उषा तांबे म्हणाल्या की, जीवनाची मूल्य साने गुरुजींनी रूजवलेली आहेत. खान्देश साहित्यिक व रत्नांची खाण आहे. साहित्य संस्थांचे मराठी साहित्य व्यवहारात योगदान आहे. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा.रमेश माने यांनी संपादित केलेल्या ‘खान्देश वैभव’ स्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार”