Sanskrit needs to be spread more to become a national language
संस्कृत राष्ट्रभाषा होण्यासाठी अधिक प्रसार होण्याची गरज – इंद्रजीत बागल
देशातील विविध भाषांच्या मूळाशी संस्कृत भाषा
जगभरात आता संस्कृतचा वापर मोठ्या प्रमाणावर
पुणे : भारताची संस्कृती आणि देशातील विभिन्न भाषांना जोडण्याचे काम संस्कृतमुळे झाले आहे, त्यासाठी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हायला हवी. मात्र त्यासाठी संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार अधिक करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पुणे आकाशवाणी केंद्राचे सहाय्यक संचालक इंद्रजीत बागल यांनी आज येथे केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या लघुसिद्धान्तकौमुदी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रे देऊन आज येथे गौरव करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
बागल पुढे म्हणाले की, आपल्या देशातील विविध भाषांच्या मूळाशी संस्कृत भाषा आहे. मूळ भारतीय तत्वज्ञान संस्कृत भाषेत विपुल प्रमाणात उपलब्ध आहे, त्यावर संशोधन करुन त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपल्याला तंत्रज्ञान आणि अन्य बाबतीत देखील करता येईल. जगभरात आता संस्कृतचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. शालेय जीवनापासून अगदी पहिल्या इयत्तेपासून संस्कृत शिकवले गेले पाहिजे, तरच ध्यानाधिष्ठीत समाजाची निर्मिती होईल, असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
लघुसिद्धान्तकौमुदीवर्ग ऑनलाइन पद्धतीने ऑगस्ट 2021 ते ऑगस्ट 2023 या दोन वर्षाच्या कालावधीत घेण्यात आला होता. यामध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी – शिल्पा कबे, वीणा आलते, सुप्रिया पुजारी, श्रीराज डोलारे, राजश्री भिडे, अनुराधा सिंगी आणि शुभदा वकनळ्ळी यांना यावेळी प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेऴी व्यासपीठावर सीए सुधीर पंडीत, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन तसेच प्रणवतीर्थ चॅरीटेबल ट्रस्टचे संदीप महाजन, डॉ. योगेश शहा, दीपक मराठे उपस्थित होते. या अभ्यासक्रमाला प्रणवतीर्थ चॅरीटेबल ट्रस्टने आर्थिक पाठबळ दिले आहे.
प्रास्ताविकात बोलतांना संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन म्हणाले की, या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेतील ग्रंथ उत्तमरीत्या वाचता येतात व त्याचे अर्थ लावता येतात. भांडारकर संस्थेत चालू असलेल्या विविध प्रकारच्या संशोधन कार्यात या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याचा संस्थेचा मानस आहे. यावेळी सर्व उपस्थित यशस्वी विद्यार्थ्यांनी अनुभव कथन केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा सप्रे यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com