The ‘SARATHI’ , the progress of the Maratha community!
मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात ‘सारथी
पुणे: मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्थापन छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात ‘सारथी’ ही खऱ्या अर्थाने प्रगतीची सारथी बनली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आदी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थी, युवकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी संस्थेकडून प्रयत्न सुरू आहेत.
‘सारथी’ ही महाराष्ट्र शासनाची नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील २५ जून, २०१८ रोजी कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अन्वये स्थापन करण्यात आलेली ‘नॉन-प्रॉफिट’ कंपनी तसेच स्वायत्त संस्था आहे. राज्यातील मराठा, कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी -मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सारथीच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी विविध कल्याणकारी उपक्रम, योजना व्यापक स्वरुपात राबवण्यात येत आहेत.
१ लाख ३३ हजारावर विद्यार्थ्यांना लाभ:
राज्यातील १ लाख ३३ हजार २३६ विद्यार्थ्यांनी या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. पीएच.डी विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती विभागात २ हजार १०९ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण विभागात २५ हजार १०७ तर शिक्षण विभागांतर्गतच्या योजनांचा २५ हजार १३७ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. तर कौशल्य विकास प्रशिक्षण विभागांतर्गत २० हजार ७४३ लाभार्थ्यांना तर सारथीच्या इतर उपक्रमातंर्गत ६० हजार १४० जणांना फायदा झालेला आहे.
भरीव निधीचा पाठींबा:
शासनाकडून या संस्थेस भरीव निधी प्राप्त होत असून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३०० कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून उपकेंद्र कोल्हापूर येथे कार्यरत आहे. त्यासोबतच सारथीचे राज्यात ८ विभागीय कार्यालये कोल्हापूर, खारघर नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. पुणे येथील मुख्यालयाच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ४२ कोटी रुपये अनुदान उपलब्ध करुन दिले असून बांधकाम गतीने सुरू आहे. शासनाने सात विभागीय कार्यालयांसाठी १ हजार १५ कोटी रुपये रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना:
छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना २०२२-२३ मध्ये एकूण ३१ कोटी २३ लाख रुपये वाटप करण्यात आले आहे. यासाठी इयत्ता ९ वी व ११ वी मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण, दहावी मध्ये ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. सारथी संस्थेने वरील अटीसह उत्तीर्ण झालेल्या व केंद्राच्या कोट्यामुळे शिष्यवृत्ती अप्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ८०० रूपये प्रमाणे वार्षिक ९ हजार ६०० रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते.
महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग:
या उपक्रमातंर्गत सारथीमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीन्ही टप्प्यांवर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी पाचशे विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थांना दरमहा १३ हजार रुपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा ९ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत १ हजार ४७९ विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी २१ कोटी रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये एकरकमी दिले जातात. सारथी मुख्यालयातून विद्यार्थ्यांना झूम मिटींगद्वारे मार्गदर्शनही करण्यात येते. त्यांच्या अडचणी, समस्या सोडवण्यात येतात. आत्तापर्यंत मागील तीन वर्षांत साडेसहाशे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. तर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात २०६ विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी ५१ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
युपीएससी परीक्षांमध्ये सारथीच्या माध्यमातून विद्यार्थी उत्तम यश प्राप्त करत असून आयएएस सेवेत तीन वर्षात १२, आयपीएस मध्ये १८ तर आयआरएस सेवेत ८, आयएफएस १ आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण १२ अशा सारथीमधील ५१ विद्यार्थ्यांची युपीएससीमार्फत निवड झालेली आहे. भारतीय वन सेवेसाठी सारथी संस्थेतील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच युपीएससी केंद्रीय सशस्त्र पोलीस बल सेवेसाठी संस्थेतील पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
राज्यसेवा प्रशिक्षण मार्गदर्शन:
युपीएससी प्रमाणेच राज्य सेवा परीक्षा अर्थात एमपीएससीमध्येही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससी प्रशिक्षणासाठी साडेसातशे विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते.
मागील तीन वर्षांत १ हजार १२५ विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी ८ कोटी २६ लाख रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना १५ हजार रुपये एकरकमी दिले जातात. तीन वर्षात ७ हजार ३६७ विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अकरा कोटी रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकरकमी १० हजार रुपये दिले जातात. त्यासोबतच विद्यार्थ्यांना सारथीच्या मुख्यालयातून झूम मिटींगद्वारे तसेच अभिरुप मुलाखतीद्वारेही मार्गदर्शन केले जाते. मुलाखतीची सर्व तयारी करुन घेण्यात येते.
मागील तीन वर्षांत ५६६ विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी ५६ लाख ६० हजार रुपयांचा लाभ डीबीटीद्वारे देण्यात आला आहे. सारथीच्या मार्गदर्शातून सन २०२१ पासून वर्ग एक श्रेणीमध्ये ७४ तर वर्ग दोन श्रेणीत २३० अशा एकूण ३०४ विद्यार्थ्यांनी यश मिळवलेले आहे.
(क्रमश:)
– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
2 Comments on “मराठा समाजाच्या प्रगतीची ‘सारथी’!”