University level poetry competition concluded at Savitribai Phule Pune University,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठस्तरीय काव्य संमेलन स्पर्धा संपन्न
लेखनासारख्या कौशल्यामुळे विचारांना चालना मिळते
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यापीठस्तरीय काव्य संमेलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्धाटन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ) विजय खरे, रासेयोचे संचालक प्रा. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुळकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना, सध्या महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी कविता करत असतात. मात्र कविता म्हणजे शब्दांचा, भावनांचा आविष्कार आहे. नुसत यमक जुळवून कविता बनत नसते. ती रचण्यासाठी सभोवतालच्या वातावरणाचे, परिस्थितीचे निरिक्षण आणि भरपूर वाचन कराव लागत असल्याचे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले. यावेळी त्यांनी विविध कविता सादर करून त्यांचा भावार्थ सांगितला तसेच त्या रचनेमागील गोष्टी सांगितल्या.
बक्षिस वितरण समारंभात बोलताना कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी एकाच गोष्टीकडे कवी आणि वैज्ञानिक कसे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात याविषयी सांगितले. तर चॅट जीपीटीच्या काळात स्वतःच्या मनातील भावना कागदावर उतरवणे अतिशय महत्त्वाचे आहे. लेखनासारख्या कौशल्यामुळे तुमच्या विचारांना चालना मिळते आणि यामुळे तुम्ही स्वतःची व्हल्यू वाढवू शकता, असेही डॉ. गोसावी यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी त्याच्या बालपणीची मराठी आणि इंग्रजी कविताही सादर केली.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील रासेयो संलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थी स्वयंसेवकांकरिता देशभक्तीपर व पर्यावरण विषयांवर या काव्य संमेलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या काव्य संमेलनात तीन जिल्हातून ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रा. डॉ. तुषार चांदवडकर (एस.पी.एच.जैन विज्ञान महाविद्यालय), प्रा.डॉ. वर्षा तोरडमल (आबासाहेब गरवारे महाविद्यालय), प्रा. डॉ. महेश दवंगे (हिंदी विभाग,सा.फु.पु.वि), प्रा. डॉ. योगेश बोराटे (वृत्तपत्र व संज्ञापन विभाग, सा.फु.पु.वि), प्रा. डॉ. संतोष धोत्रे (फर्ग्युसन महाविद्यालय) यांनी परिक्षकाची भूमिका पार पाडली. या विद्यापीठस्तरीय स्पर्धेआधी ही स्पर्धा महाविद्यालयीन आणि जिल्हास्तरावर घेण्यात आली होती. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेते विद्यार्थी आज या स्पर्धेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सविता कुळकर्णी, डॉ.प्रभाकर वऱ्हाडे यांनी केले.
विजेत्यांची विद्यार्थ्यांची नावे
मराठी
१- चित्रांगा सुरेश थिगळे, ए.एस.सी. कॉलेज हरसूल
२- स्वाती बाळू जाधव, विद्या प्रतिष्ठानचे क. वा. व वि. महाविद्यालय सुपे
३- चिन्मयी डोळे, एम. ई. एस. गरवारे महा-पुणे
हिंदी
१- समाधान वव्हाळ, के. जे. सोमैय्या, कोपरगांव
२- धनश्री महाले, एम. बी. टी. लॉ. कॉलेज, नाशिक
३- वैष्णवी प्रकाश पाटील, डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ़ इंजीनियरिंग अॅण्ड इनोवेशन
इंग्रजी
१- गौरी शेळके, कॉलेज ऑफ आर्ट्स, भिगवण
२- तेजस्विनी राजू गायकवाड, स्वामी सहजानंद भारती बी. एड. कॉलेज, श्रीरामपूर
३- मुस्कान यादव, ए. एस. एम. कॉमर्स, सायन्स अॅण्ड आयटी, पिंपरी
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
इस्रोच्या जीएसएलव्ही-एफ१४ या उपग्रहाचं उद्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपण