The rendition of scenes from the epic Ramayana enchants Mumbaikars
महाकाव्य रामायणातील प्रसंगांच्या सादरीकरणाची मुंबईकर रसिकांवर मोहिनी
रामायणातील एकेक पात्रातून जीवन प्रणालीची ओळख – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे..अशा एकेका अजरामर गीतांचे सादरीकरण
मुंबई : भव्य सेट, आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई व डोळ्यांचे पारणे फेडणारे महाकाव्य रामायणातील प्रसंग यांनी उपस्थितांना अक्षरशः मोहिनी घातली. गीत, नाट्य, नृत्य आणि वादनाच्या माध्यमातून रामायणातील एकेका प्रसंगाचे सादरीकरण होत गेले आणि रसिक या रामायण भक्तीत हरवून गेले. दरम्यान, रामायण हे नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख करून देते. रामायणातील एकेक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रामायण मालिकेतील श्रीरामांच्या भूमिकेने प्रसिद्ध अभिनेते अरुण गोविल, आनंद माडगूळकर, अभिनेत्री रवीना टंडन, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.
महाकाव्य रामायण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांनी पुन्हा एकदा ग.दि. माडगूळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आणि सुधीर फडके यांच्या आवाजातून अजरामर झालेल्या गीतरामायणातील विविध प्रसंगांतील गीतांचे सादरीकरण प्रत्यक्ष अनुभवले. स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे..अशा एकेका अजरामर गीतांचे सादरीकरण यावेळी झाले त्याला रसिकांनी मनापासून दाद दिली.
यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ४९६ वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी रोजी श्रीरामाची अयोध्या येथे पुनर्प्रतिष्ठापना झाली. त्यासाठी महाराष्ट्राचे योगदान लाभले, ही भाग्याची गोष्ट. मंदिरातील महाद्वारासाठी लागणारे लाकूड (काष्ठ) हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. रामायणातील जटायू हे महत्वाचे पात्र आहे. त्या जटायू संवर्धनासाठी आपण नाशिक, ताडोबा आणि पेंच येथे तीन जटायू संवर्धन केंद्रे सुरू केली आहेत. रामायणातील एकेक पात्र जीवन प्रणाली सांगणारे आहे. संकटातून सावरण्याचे बळ प्रभू श्रीराम देतात, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. दिनांक २१ ते २५ फेब्रुवारी रोजी खारघर येथे अश्वमेध यज्ञ आयोजित केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले, नवीन पिढीपर्यंत आपली संस्कृती पोहोचवण्याचे काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे, ही अतिशय चांगली बाब आहे.
श्री. माडगूळकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गीतरामायणाच्या आठवणी खूप आहेत. दिवसेंदिवस गीतरामायणाची लोकप्रियता वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. रामायणाची तत्व आपल्या सर्वांच्या जीवनात भिनली असल्याचे त्यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com