Sharad Pawar alleges action against Nawab Malik for political motives
नवाब मलिक यांच्यावर राजकीय हेतूनं कारवाई केल्याचा शरद पवार यांचा आरोप
पुणे : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर चुकीच्या पद्धतीनं कारवाई झालेली असून ती जाणूनबुजून आणि राजकीय हेतूनं केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक झाली होती, पण त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकलं नव्हतं, मग मलिक यांना वेगळा न्याय का द्यावा, असा सवालही त्यांनी केला.
राजकारण्यांनी आणि नेत्यांनी उद्घाटनांमधे व्यस्त न राहता युक्रेनमधे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याकडे अधिक लक्ष द्यावं, असं ते म्हणाले.या विषयाचं राजकारण न करता केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांना परत कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करण्यावर भर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर भारतानं तटस्थ भूमिका घेतल्यामुळे युक्रेनमधले नागरिक तिथल्या भारतीयांवर नाराज आहेत, हे लक्षात घेऊन सरकारनं लवकरात लवकर पावलं उचलावीत असं ते म्हणाले. युक्रेन आणि रशियात हजारों भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत त्यामुळे याबद्दल आपण परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांशी चर्चा केल्याचं पवार यांनी सांगितलं.