‘This government will change the lives of common people’
‘हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे जिल्ह्यात “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ४५ लाख ४२ हजार ६७३ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ
आज नव्याने २० हजार २९६ लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ
ठाणे : “शासन आपल्या दारी” हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून त्यांना न्याय देण्यासाठी “शासन आपल्या दारी” च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. दि.15 एप्रिल 2023 पासून “शासन आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्हयात एकूण 45 लाख 42 हजार 673 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला असून आज नव्याने 20 हजार 296 लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात येणार आहेत. म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कल्याण येथे केले.
“शासन आपल्या दारी” या उपक्रमाचे आयोजन प्रीमियर मैदान, कल्याण शिळफाटा, कोळे, कल्याण येथे करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, हे शासन गरजू लाभार्थ्यांना त्यांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविणारे शासन आहे. शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. वैयक्तिक लाभाबरोबरच सामूहिक लाभ आणि वेगवेगळे मोठे प्रकल्प सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू झाली. यातून समृध्दी महामार्ग, अटल सेतू, मेट्रो अशा विविध कामांचे उद्घाटन करून महाराष्ट्र विकासकामांच्या यादीत आपण पहिल्या क्रमांकावर आणला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्य सरकारला केंद्र शासनाचे मोठे पाठबळ मिळत आहे. त्यामुळे राज्याचा विकास चौफेर आणि वेगवान पद्धतीने होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “शासन आपल्या दारी” हा उपक्रम राज्यात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पहिल्यांदाच सुरू केला. सामान्य माणसाला आपल्या कामासाठी सरकारी कार्यालयात सतत जावे लागायचे. त्यापेक्षा राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी पात्र लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा. या उद्देशाने सुरु केलेल्या या उपक्रमामुळे एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही, असे मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोचविण्यासाठी काम सुरु आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेतून जनधन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीब व्यक्तीचे बँकेमध्ये खाते सुरू केले आहे. “शासन आपल्या दारी” योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जातो.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले की, जिल्ह्यातील विविध भागातून लाभार्थी आले आहेत. सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याची आपली जबाबदारी पार पाडली आहे.
ते म्हणाले की, मेट्रो- 12 च्या निविदाचे काम पूर्ण झाले असून त्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे पसरत आहे. कल्याण ते तळोजा मेट्रो होत आहे. येणाऱ्या काळात कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो आणणार आहोत. तिसरी मुंबई ही नवी मुंबई ते कल्याण यामध्ये विकसित होत आहे. एम.एम.आर.डी.ए. नवीन डीपीआर तयार करीत आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम येथे होत आहे. अंबरनाथ मध्ये दीडशे कोटी अनुदान मिळाले, त्याचे आज भूमीपूजन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटचा दीक्षांत समारंभ संपन्न