The spontaneous response of the people of Pune on the very first day of Shivgarjana Mahanatyam
शिवगर्जना महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात महानाट्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात
पुणे : मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट….मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया…..महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा… तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण…. स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप….जणू शिवकालीन इतिहास दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर अवतरला. निमित्त होते ‘शिवगर्जना’ महानाट्याचे…..
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवगर्जना महानाट्याच्या आयोजनाबाबत संदेश यावेळी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती होण्यासोबत त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या काळात आपण प्रदूषण, रोगराई, दारिद्र्य, बेरोजगारी विरुद्ध लढले पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकंडवार यांनी केले.
आमदार टिंगरे म्हणाले, पुणे जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भूमीत त्यांचा पराक्रम सांगणारे शिवगर्जना महानाट्य होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. ते म्हणाले, पुढच्या पिढीच्या मनावर छत्रपतींचा विचार आणि कार्याचा आदर्श बिंबविण्यासाठी सर्वांनी हे महानाट्य अवश्य पहावे आणि हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.
भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास
देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. देशप्रेम जगविणारे संवाद, ताकदीचा अभिनय, ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य, प्रसंगानुरूप गीत-नृत्य आणि संगीत यामुळे त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले. स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली.
महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने दुमदुमला. नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
‘शिवगर्जना’ महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “शिवगर्जना महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”