सर ज. जी. कला महाविद्यालय कलेचे जागतिक केंद्र व्हावे

The Sir Jamsetjee Jeejeebhoy School of Art सर ज.जी. कलामहाविद्यालय तथा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट

Sir J. J. Art college to become world centre of art

सर ज. जी. कला महाविद्यालय कलेचे जागतिक केंद्र व्हावे – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जाThe Sir Jamsetjee Jeejeebhoy School of Art सर ज.जी. कलामहाविद्यालय तथा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट

मुंबई : भारताला चित्रकलेचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. त्यानुसार १९ व्या शतकात स्थापन झालेल्या सर ज. जी. कला महाविद्यालयाने राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरील कलावंत घडविले आहेत. या महाविद्यालयाने भारतीय ज्ञान, परंपरेचे वारसा संवर्धित करीत जागतिक कलेचे केंद्र व्हावे. त्यासाठी या महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी येथे केले.

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सर ज. जी. कला, वास्तुकला व उपयोजित कला महाविद्यालाय, मुंबई यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व सदिच्छा भेटीचा कार्यक्रम आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सर ज. जी. कला महाविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केल्याचे पत्र सुपूर्द केले.

केंद्रीय मंत्री श्री. प्रधान म्हणाले की, मराठी आणि ओरिया भाषेत साम्य आहे. आपणास मराठी समजते. या भूमीला अभिवादनासाठी आपण येथे आलो आहोत. चित्रकलेत सृजशाची शक्ती आहे. भारतीय समाज हा पूर्वीपासून प्रगत आहे. त्याचे प्रतिबिंब भारतीय कलेत उमटले आहेत. ज्याची मुळे संस्कृतीशी जोडलेली असताता तो समाज सृजनशील आणि नवनिर्मिती करणारा असतो. १९ व्या शतकात स्थापन झालेले कला महाविद्यालय भारताचा गौरवशाली वारसा आगामी काळातही पुढे नेईल. तसेच भारतीय कलेचा अभ्यास आणि अध्ययन करणारे केंद्र व्हावे, असाही विश्वास केंद्रीय मंत्री श्री. प्रधान यांनी व्यक्त केला.

देशात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिली व दुसरीची क्रमिक पाठ्यपुस्तके तयार आहेत. तिसरी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या मुख पृष्ठावर भारतीय परंपरा, संस्कृती, खेळ, ज्ञान, परंपरेची माहिती देण्यासाठी चित्रे काढण्याची जबाबदारी या महाविद्यालयावर सोपविण्यात येईल. भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुणांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम या महाविद्यालयाने तयार करावा, असेही मंत्री श्री. प्रधान म्हणाले.

विधान सभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, कुलाबा परिसरात जे. जे., जहांगीर आर्ट गॅलरी, एनसीपीए या कला क्षेत्रातील संस्था आहेत. त्यामुळे हा परिसर कला क्षेत्राची राजधानी म्हटला पाहिजे. त्यात जे. जे. स्कूल ऑफ आर्ट हा या परिसराचा मुकुटमणीच म्हटला पाहिजे. विधिमंडळाचे नूतनीकरण करताना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट चा सल्ला उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशाच्या इतिहासात १८५७ या वर्षाला अत्यंत महत्वाचे आहे. याच वर्षी पहिले स्वातंत्र्य समर झाले, तर याच वर्षी या कला महाविद्यालयाची स्थापना झाली. कलेला जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. या महाविद्यालयाने देशाला कला, वास्तुविशारदासाठी चांगले आणि दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. भारताचे कलात्मक रुप जगासमोर आणण्यात या महाविद्यालयाचे मोठे योगदान राहिले आहे. त्यात कालानुरुप बदल करणे आवश्यक होते. त्यासाठी मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आता या संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यांना स्वत:चा विचार, प्रचार- प्रसाराची संधी मिळणार आहे. भावनांची कलात्कता समाजात सकारात्मकता तयार करते. व्यक्तींमधील जाणिवा विकसित होतात. कलेच्या माध्यमातून त्या- त्या समाजाची कलात्मकता लक्षात येते. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश होत आहे. असे असले, तरी मानवी प्रज्ञाच श्रेष्ठ ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई शहरचे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्नाखाली तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे देशाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. वैभवशाली वारसा असलेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, सर जे. जे. कला महाविद्यालय आशियातील पहिले कला महाविद्यालय आहे. हा परिसर ऐतिहासिक वारसा आहे. या परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान करण्यात आला. अभिमत विद्यापीठामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांचा दर्जा आणखी उंचावणार आहे. तसेच या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. या महाविद्यालयाचा चेहरा- मोहरा बदलण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह तयार करण्यात येत आहे. त्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर ऐतिहासिक इमारतींच्या नूतनीकरणासाठी २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले की, या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात या महाविद्यालयाने आपले योगदान दिले आहे. अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. हे सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात आले. या महाविद्यालयाच्या माध्यमातून नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

रुस्तमजी जिजिभाय यांचा सत्कार

या कला महाविद्यालयाच्या स्थापनेत योगदान देणारे सर जमशेदजी जिजिभाय यांचे वंशज रुस्तमजी जिजिभाय उपस्थित होते. त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
महाराष्ट्रात उद्योग उभारणीसाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक दृढ करणार

 

Spread the love

One Comment on “सर ज. जी. कला महाविद्यालय कलेचे जागतिक केंद्र व्हावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *