Appeal to government institutions to register for skill development
कौशल्य विकासाकरिता सूचिबद्ध होण्याचे शासकीय संस्थांना आवाहन
पुणे : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या हेतूने शासकीय संस्था, कृषी केंद्रे आदींना सूचिबद्ध प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रोजगाराबाबत बदलत्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थितीत कौशल्य विकास व उद्योजकतेस अधिक प्रोत्साहन देण्याकरिता राज्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने राज्य शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत सन २०२२-२३ मध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण राबवण्याचे प्रस्तावित आहे.
जागतिक स्तरावर वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानानुसार कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत शासकीय संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविताना सदर आस्थापनांना कौशल्य विकासाच्या कामकाजामध्ये समाविष्ट करुन घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
विविध शासकीय संस्था, कृषी केंद्रे आदींनी सूचिबद्ध प्रशिक्षण संस्था म्हणून शासनाकडे नोंदणीकृत होण्याबाबतची माहिती घेण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र पुणे कार्यालयास १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता प्रभारी सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com