State-level inauguration ceremony of Diamond Jubilee State Drama Competition on 21st February
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा उद्या दि. २१ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा उद्या, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन
पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि १९ जिल्ह्यांमधील मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धा घेता आली नव्हती. यंदाचे वर्ष हे स्पर्धेचे हीरक महोत्सवी वर्ष असल्याने व आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होत असल्याने त्यास विशेष महत्त्व असल्याचे श्री. देशमुख म्हणाले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धा हौशी मराठी, बाल, हिंदी, संगीत, संस्कृत, दिव्यांग बाल नाट्य अशा सहा विविध प्रकारांमधून राज्यातील ३४ केंद्रांवर घेण्यात येणार आहेत.
जवळपास तीन महिने अविरत चालणाऱ्या या स्पर्धांमधून एकूण ६७४ संघ भाग घेणार आहेत अशी माहिती देत सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघ व कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.