State Marathi Amateur Music and Drama Competition named as ‘Sangitsurya Keshavrao Bhosale Music Drama Competition’
राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण
मुंबई : उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि नाट्य कलेचा प्रचार व प्रसार सर्व स्तरातून व्हावा या उद्देशाने आयोजित होणाऱ्या राज्य मराठी हौशी संगीत नाट्य स्पर्धेचे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा’ असे नामकरण करण्यात आले असल्यासंदर्भातील शासन निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्गमित केला आहे.
नव कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्या कलागुणांमधून व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा यासाठी शासनामार्फत गेली ६० वर्षे या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धा ही एक राज्यस्तरीय स्पर्धा आहे. या स्पर्धेस संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे नाव देण्यात आले आहे.
केशवराव भोसले यांनी संगीत शारदा, संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटीक, संगीत मानापमान अशी अनेक अजरामर नाटके सादर केली. संगीत नाटक या प्रकारातील एक अतुलनीय अभिनेते व गायक म्हणून त्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने राज्य हौशी मराठी संगीत नाट्य स्पर्धेचे संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धा असे नामकरण करण्यात आले आहे, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.