Congratulations from Chief Minister Eknath Shinde for the successful launch of Aditya L-1 in Solar Mission
सौर मोहिमेतील आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
पुण्यातील ‘आयुका’चा सहभाग अभिमानास्पद
मुंबई : चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सुर्ययान सुर्याच्या अभ्यासासाठी यशस्वीरित्या प्रक्षेपण करून, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी इस्त्रो या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुर्याच्या संशोधनातील भारताच्या भरारीचे कौतुक केले आहे. तसेच या मिशनमध्ये पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे .
अभिनंदन संदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील स्थान बळकट झाले आहे. भारत जगातील असा चौथा देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर प्रग्यान हे रोव्हर उतरवून भारताने विक्रमच केला आहे. पाठोपाठ आपण सुर्याच्या संशोधनाच्या दृष्टीने आज आणखी एक मोठी झेप घेतली आहे.
आदित्य एल- १ या पहिल्याच सुर्ययानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारत चंद्र आणि सुर्य संशोधनात कामगिरी करणारा आणि त्यामध्ये सातत्य राखणारा जगाच्या दृष्टीने महत्वाचा देश ठरला आहे. या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावले उचलता येणार आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून वैज्ञानिक दृष्ट्या बलाढ्य असा देश अशी ओळख निर्माण झाली आहे.
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे चंद्रयान-२च्या एका अपयशातून बाहेर पडून, इस्त्रोने ही मोठी भरारी घेतली आहे. यापुढेही इस्त्रोची कामगिरी अशीच उंचावणारी राहील, असा विश्वास आहे. इस्त्रोच्या या कामगिरीला तोड नाही. या मोहिमेत सहभागी सर्व संशोधक – वैज्ञानिक, अभियंते आदींचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सौर मोहिमेतील आदित्य एल-१ चे यशस्वीरित्या प्रक्षेपण”