The work of Swami Govinddev Giri Maharaj is extraordinary
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे कार्य अलौकिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन
मुंबई : स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे गीता परिवार, महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगभर सुरू असलेले कार्य अलौकिक आहे. अशा व्यक्तींच्या कार्यातून कामाची प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा मिळते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे काढले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हिंदू जनजागृती समितीतर्फे आज सायंकाळी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. या मानपत्राचे वाचन मंजिरी मराठे यांनी केले. तसेच रणजित सावरकर लिखित पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षात मानवी जीवन धकाधकीचे आणि स्पर्धेचे झाले आहे. अशा काळात स्वामी गोविंददेव गिरी महाराजांसारख्या व्यक्तींचा सहवास वेगळी अनुभूती आणि जीवन जगण्याची प्रेरणा देतो. त्यांचे धर्मकार्य अलौकिक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाकडे जात आहे. जगात देशाचा सन्मान वाढला आहे. राज्य शासन सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध उपाययोजना करीत आहे. राज्यातील प्राचीन मंदिरे, गड – किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून कार्याची प्रेरणा मिळाली. आयुष्यभर समाजकार्य केले. यापुढेही हे कार्य सुरू राहील.
तत्पूर्वी विधान परिषदेच्या सभापती डॉ. गोऱ्हे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला. श्री. सावरकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी स्वामी गोविंददेव यांच्या कार्याची माहिती दिली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी शासन पूर्णपणे मदत करेल
One Comment on “स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे कार्य अलौकिक”