To develop ‘Mavim’ as a centre of excellence
सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ‘माविम’चा विकास करणार – महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट आणि बिल ॲण्ड मिलिंडा गेटस फाऊंडेशनच्या मदतीने लिंग समभाव सचेतना (Gender Transformation Mechanism) या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आगामी काळात ‘माविम’चा सेंटर ऑफ एक्सलन्स विकसित करण्यात येईल. असे प्रतिपादन महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आयफॅड व बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने ‘जेंडर ट्रान्सफर्मेशन मेकॅनिझम‘ अंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स‘ च्या कार्यनितीवर चर्चेसाठी ‘सेंटर ऑफ एक्सेलेन्स स्ट्रॅटेजी स्टेकहोल्डर‘ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, बिल अॅण्ड मिलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या विकी वाइल्ड व आयफडच्या नदाया बेल्टचिका उपस्थित होते.
डॉ. यादव म्हणाले की, कार्यशाळेच्या माध्यमातून एक प्रारुप मॉडेल उपलब्ध करण्यात येईल. या प्रकल्पासाठी ‘माविम’ला मदत करत असल्याबद्दल त्यांनी आयफॅड व बीएमजीएफ च्या प्रतिनिधींचेदेखील आभार मानले.
महाराष्ट्र इन्फर्मेशन फॉर टेक्नॉलॉजी चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी ‘माविम’च्या कामाचे कौतुक करत महिला सशक्तीकरण, स्त्री पुरुष असा भेद न करता समान अधिकार, कुटुंब नियोजनातून महिला सशक्तीकरणाकडे, चौकटीच्या बाहेर जाऊन विचारवृत्ती अशा विविध पैलूंवर मनोगतातून प्रकाश टाकला.
या कार्यशाळेत वनामती, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पर्यटन संचालनालय, कृषी विभाग या शासकीय संस्था, आयआयएम नागपूर, आयआयटी मुंबई या शैक्षणिक संस्था, संबोधी, प्रदान या इतर राज्यातील संस्था, एचडीएफसी, आयसीआयसीआय, सीडबी, या बॅंकिंग संस्था, रिलायंस फाऊंडेशन, महेंद्र सीएसआर, टीस या खासगी संस्था, सोपेकॉम, स्त्री मुक्ती संघटना, सम्यक, टिसर या स्वयंसेवी संस्था तसेच यूएन वुमन, युनिसेफ, जीआयझेड या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी उपस्थित होते.
‘माविम’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. जाखड यांनी प्रास्तविक केले. महाव्यवस्थापक (प्रकल्प) कुसुम बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, सरिता राऊत यांनी ‘स्ट्रॅटेजी पेपर’ चे संक्षिप्त सादरीकरण केले.
या कार्यशाळेची ७ सत्रांत विभागणी करण्यात आली होती. यात प्रामुख्याने ४ गट करुन गट चर्चादेखील करण्यात आली. प्रत्येक गटाने आपले सादरीकरण केले. या सर्व गटांच्या झालेल्या चर्चेचा एकत्रित सार तयार करुन स्ट्रॅटेजी पेपर अंतिम करण्यात येणार असून येणाऱ्या काळात हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे. सूत्रसंचालन रुपा मिस्त्री यांनी, तर गौरी दौंदे यांनी आभार मानले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून ‘माविम’चा विकास करणार”