Tenth-twelfth exams will be held offline only, in schools and colleges where students are studying.
दहावी – बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार, शिक्षण घेत असलेल्या शाळा-महाविद्यालयातच होणार परीक्षा.
पुणे : राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र, उपकेंद्र दिलं जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज
बातमीदारांना ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून, त्यामुळे विद्यार्थी ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात शिकत आहेत, त्यांना लेखी परीक्षा देता येईल, असं ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परिक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धातास, तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे. सर्व परिक्षा केंद्रांवर, कोविड-१९ मुळे आजारी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र परीक्षा कक्ष असेल. एखाद्या विद्यार्थ्यांला परीक्षेदरम्यान लक्षणं दिसली, तर त्याला स्वतंत्र कक्षात परीक्षा देण्याची मुभा असेल. जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रामार्फत परिक्षा केंद्राला आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली जाईल.