The best quality service should be provided to the passengers
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल ५,१५० इलेक्ट्रिक बसगाड्यांचे ठाण्यात लोकार्पण
ठाणे : खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’ असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. ‘गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी’ या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचते. इलेक्ट्रिक बस, सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.
ते पुढे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एसटी बस प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना, 65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.
एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली आहे अशा प्रकारे तिचा सांभाळ करायला हवा, असे आवाहन करुन मुख्यमंत्र्यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत, असे निर्देश दिले. गेल्या आठ महिन्यांपासून आपण ‘हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा मी लवकरच आढावा घेणार आहे.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ‘हात दाखवा एसटी थांबवा’ या उपक्रमामुळे लोक आणि एसटीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एसटी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एसटी ला नफ्यात आणू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
सचिव पराग जैन यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी”