With the ‘CMP’ system, salaries of teachers will now be paid without delay
‘सीएमपी’ प्रणालीमुळे, शिक्षकांचे वेतन आता विनाविलंब होणार
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जानेवारी, २०२४ पासूनचे वेतन आता नियमित वेळेत होणार आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएमपी (कॅश मॅनेजमेंट प्रोजेक्ट) प्रणालीमार्फत तसेच ज्या जिल्ह्यांत ई-कुबेर कार्यरत आहे, त्या जिल्ह्यांत ई-कुबेर प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका/ नगरपालिका यांमधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतन देयकास विविध कारणांमुळे विलंब होत असे. ही बाब लक्षात घेता, वेतनाचे प्रदान सीएमपी प्रणालीमार्फत थेट संबंधिताच्या खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या सीएमपी प्रणाली व ई- कुबेर प्रणालीमार्फत प्रदानासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात येत आहेत. सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि संबंधित कोषागार अधिकारी याचे तंतोतंत पालन करतील. याबाबतचा शासन निर्णय 4 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आला आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘सीएमपी’ प्रणालीमुळे, शिक्षकांचे वेतन आता विनाविलंब होणार”