Inauguration of the District Book Festival organized by the Government of Maharashtra
महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे माजी महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘जिल्हा ग्रंथोत्सव- २०२३’ चे माजी महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
देऊळमळा चिंचवड येथील श्रीमान महासाधु मोरया गोसावी समाधी मंदिराजवळच्या पटांगणात आयोजित या कार्यक्रमास प्र.ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष मोहन शिंदे, कार्यवाह सोपानराव पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती ढोरे म्हणाल्या,धावपळीच्या युगात ग्रंथ मार्गदर्शक ठरतात. माणसाला मार्गदर्शन करणारे केंद्र म्हणून ग्रंथालयांची आवश्यकता आहे. सामान्य परिस्थितीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथालय हा मोठा आधार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.भुर्के म्हणाले, ग्रंथ मानवी जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करतात, तर ग्रंथालये वाचकांची ज्ञानाची तहान भागविण्याचे काम करतात. त्यामुळेच ग्रंथ आणि ग्रंथालये समाजासाठी महत्वाची आहेत.
श्री.गाडेकर म्हणाले, वाचनसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी असे महोत्सव जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहेत. यानिमित्ताने दर्जेदार ग्रंथ वाचकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. नवमाध्यमांच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी वाचकांना अपेक्षित असलेले साहित्य ग्रंथालयांनी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. ई-ग्रंथालयांसाठी शासनातर्फे आवश्यक सुविधा देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
श्रीमती गोखले यांनी प्रास्ताविकात ग्रंथमहोत्सवाविषयी माहिती दिली. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि ग्रंथविक्रेत्यांना ग्रंथ विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात करण्यात आली. क्रांतिवीर चाफेकर विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल चिंचवड आणि आर्य समाज विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडीत सहभाग घेतला. यावेळी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपस्थित होते.
ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री आणि त्यासोबतच विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन”