The immersion procession in the Sasane Nagar area of Hadapsar concluded with a gaiety
हडपसर ससाणे नगर भागात विसर्जन मिरवणुका जल्लोषात संपन्न
हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे विसर्जन मिरवणूक विनाअडथळा संपन्न
गणेशभक्त आणि कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित – वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
हडपसर : भल्या सकाळी सूर्यकिरणं आणि दुपारी वरुणराजाच्या जलाभिषेकात बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…च्या जयघोषात श्रींची विसर्जन मिरवणूक उपनगर आणि परिसरात जल्लोषात झाली. ढगांचा कडकडाट, विजांचा चमचमाटामध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित होत असल्याचे पाहायला मिळाले.
घरच्या बाप्पाला सकाळी, तर सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दुपारनंतर वरुणराजाच्या साक्षीने विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आबालवृद्धांनी तुफान गर्दी केली होती.
हडपसर, ससाणेनगर, मुंढवा, केशवनगर, उंड्री, पिसोळीमध्ये गणेशभक्तांनी वरुणराजाचे स्वागत करीत बाप्पाचे विसर्जन केले. वरुणराजाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, श्रींच्या विसर्जन मिवरणुकीदरम्यान वरुणराजाच्या दमदार आगमानाने बळीराजा सुखावला आहे.
सार्वजनिक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी तयार केलेले देखावे वरुणराजाने धुवून काढले. रस्तोरस्ती साचलेल्या पाण्यातून गणेभक्तांनी देखावे पाहण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती. भर पावसात कार्यकर्ते आणि गणेशभक्तांचा तसूभरही उत्साह कमी झाला नव्हता. पावसाने उघडीप दिल्यानंतर सायंकाळी पाचनंतर मंडळांच्या बाप्पाच्या मिरवणुका सुरू झाल्या.
ससाणेनगर नवनाथ तरुण मंडळ, सातवनगर नवजीवन तरुण मंडळ, वाडकरमळा पद्ममावती तरुण मित्रमंडळ, ससाणेनगर स्वराज्य मित्रमंडळ, लालबहादूर मित्रमंडळ, वंदे मातरम् मित्रमंडळ, गणराज मित्रमंडळ, पंचशील मित्रमंडळ, राजमुद्रा मित्रमंडळ, अभिषेक मित्रमंडळांची विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरली.
आकर्षक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फुलांची सजावट, डिजेचा दणदणाट, वरुणराजाचा जलाभिषेकामध्ये जुन्या-नव्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यावर तरुणाईने ठेका धरला होता.
बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया.. जयघोषामध्ये चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन तरुणाई डिजेच्या तालावर बेधुंद नाचताना दिसत होती. त्यामध्ये महिला-मुलींनीही उत्साहात बाप्पाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सायकलवाल्या ब्रिक लावून थांब, उरात होतंय धडधड, लाली गालावर आली, झिंगाट, डफलीवाले डफली बजा अशा गाण्यांचा मिरवणुकीमध्ये खच्चून साज दिसून येत होता. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, गुलाबपुष्पवृष्टी, हलका गुलालाचा वापर, बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्याचवेळी वरुणराजाने जलाभिषेक करून गणेशभक्तांसह कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित केला.
विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांसाठी विनाअडथळा करण्यासाठी स्वप्नील पाटील, आशिष वाडकर, दीपक गायकवाड, हर्षल भोसले, विलास शेजवळ, भारत गायकवाड,गणेश हांडे, मुकेश सोनवणे, संजय शिंदे, दिलीप गायकवाड, इम्रान मण्यार, जीवन काळे, तेजस काळे, तुषार हिंगणे, विलास दहिगावकर यांनी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यामुळे विसर्जन मिरवणूक विनाअडथळा झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.ससाणे नगर नागरी कृती समिती च्या वतीने सर्व मंडळांचे स्वागत करण्यात येत होते .
यावेळी समितीचे समन्वयक शैलेंद्र चव्हाण, अनिल तावरे,किरण झांबरे,मुकेश वाडकर,हेमंत वाडकर,महेंद्र बनकर, उनेचा,विशाल जाधव, दिलीप गायकवाड यावेळी उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “हडपसर ससाणे नगर भागात विसर्जन मिरवणुका जल्लोषात संपन्न”