The journey of ‘Startup’ to unfold in the University!
विद्यापीठात उलगडणार ‘स्टार्टअप’ चा प्रवास.!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बुधवारी आणि गुरुवारी इनोफेस्ट २०२२ समिट
पुणे,दि.१५- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाकडून यंदाच्या वर्षीचा इनोफेस्ट २०२२ समिट आयोजित केला असून या दोन दिवसीय कार्यक्रमात देशापरदेशातील ३१ विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यातील अनेक जण हे स्टार्टअपपासून सुरुवात करत आज मोठमोठ्या पदापर्यंत पोहोचले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दरवर्षी स्टार्टअप घडविण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या इनोफेस्ट चे आयोजन केले जाते. यामध्ये ‘इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस’ पिच फेस्ट, इनोफेस्ट समिट आदी कार्यक्रम तसेच स्पर्धांचा समावेश असतो.
पुणे शहर हे स्टार्टअप चे शहर म्हणून नावारूपाला येत असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विशेष योगदान आहे. मागील दोन वर्षीप्रमाणे याही वर्षी इनोफेस्ट साठी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी तसेच या विषयात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी लाभ घ्यावा.
डॉ. अपूर्वा पालकर, संचालिका
नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
मागील वर्षी कोव्हिड महामारीमुळे हा फेस्ट ऑनलाइन पार पडला होता. मात्र यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये स्टार्टअप सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी, बिजनेस मॉडेल, स्टार्टअप मधील समस्या आणि त्यांचे निराकरण, गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून स्टार्टअप, संशोधन आणि पेटंटसाठीच्या आवश्यक बाबी आदी विषयांवर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार असल्याचे नवोपक्रम केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर यांनी सांगितले. याबाबची अधिक माहिती http://iil.unipune.ac.in/ या संकेतस्थळावर मिळेल.