The names of the mayors and deputy mayors of most of the Nagar Panchayats in Beed, Yavatmal, Gadchiroli, Dhule and Sindhudurg districts have been announced.
बीड, यवतमाळ, गडचिरोली, धुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बहुतांश नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची नावे जाहीर
बीडमध्ये पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बाजी मारली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातल्या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने वर्चस्व राखलं आहे. वडवणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर केजमध्ये आघाडी आणि आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपाने बाजी मारली आहे . प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या वडवणी नगरपंचायतीत भाजपाचे सदस्य गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सहा पैकी चार नगरपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या असून शिवसेनेनं भाजपाशी युती करून काँग्रेसला धक्का दिला आहे. या निवडणुकीत तीन ठिकाणी महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसून येत आहे. वणी उपविभागातल्या मारेगावमध्ये भाजपाच्या साथीनं शिवसेनेचे डॉ. मनीष मस्की तर झरीजामनीमध्ये शिवसेनेच्या ज्योती बीजगुणवार विजयी झाल्या. महागावमध्ये शिवसेनेच्या करुणा शीरबीरे तर बाभूळगावमध्ये शिवसेनेच्या संगीता मालखुरे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. कळंब मध्ये काँग्रेसच्या अफरोज बेगम फारुख सिद्दीकी, तर राळेगाव मध्ये काँग्रेसचे रवींद्र सेराम नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. आपल्याबरोबर दगाफटका करण्याचा काँग्रेसचा डाव लक्षात आल्यानं गनिमी कावा करत आपण तीन नगर पंचायतींवर भगवा फडकावल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. तर शिवसेना-भाजपा हे एकाच विचारधारेचे पक्ष असल्यानं एकत्र आले असं भाजपानं स्पष्ट केलं.
गडचिरोली जिल्ह्यातल्या ९ नगरपंचायतींपैकी ५ नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड आज झाली. यापैकी धानोरा, चामोर्शी आणि एटापल्ली तालुक्यात काँग्रेसनं बाजी मारली. कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारानं बंडखोरी केल्यानं शिवसेना-काँग्रेस आघाडी सत्तारुढ झाली, तर अहेरी नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघानं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बंडखोर उमेदवारांच्या सहकार्यानं सत्ता प्रस्थापित केली. मुलचेरा, सिरोंचा, भामरागड आणि कोरची नगरपंचायतीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नावं उद्या घोषित होणार आहेत.
धुळे जिल्ह्यातल्या साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदावर भाजपाच्या जयश्री पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे जेष्ठ नेते बापुसाहेब गिते १७ पैकी ११ मतं मिळवत विजयी झाले. शिवसेनेच्या पंकज मराठे यांना अपक्षासह ५ मतं मिळाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज झालेल्या नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन नगर पंचायतींवर भाजपचे तर दोन नगर पंचायतींवर महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. कसई-दोडामार्ग नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदी भाजपचे चेतन चव्हाण आणि उपनराध्यक्षपदी देविदास चव्हाण यांनी निवड झाली आहे. वाभवे-वैभववाडी नगर पंचायतींवर सुद्धा भाजपचेच वर्चस्व राहिले. नगराध्यक्षपदी नेहा माईणकर तर उपनगराध्यक्ष पदी संजय सावंत विराजमान झाले. कुडाळ नगर पंचायतींवर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या आफ्रीन अब्बास करोल या नगराध्यक्षपदी तर शिवसेनेचे मंदार शिरसाट उपनगरध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. देवगड-जामसंडे नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिताली सावंत यांची निवड झाली आहे.