Universities should effectively implement the new education policy
विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : विद्यापीठांनी शैक्षणिक वेळापत्रक व गुणांकन कार्यपद्धतीचे अचूक नियोजन करावे आणि नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, विलेपार्ले, मुंबई येथे नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठित केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, उद्योजक भरत अमलकर, प्राचार्य अनिल राव, माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, जोगिंदर सिंग दिसेन, युगांक गोयल, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीला अधिक गती अपेक्षित आहे. त्यासाठी गठित केलेल्या समितीने सातत्यपूर्ण मंथन करावे आणि अंमलबजावणीसाठी काय अडचणी आहेत याबाबत सूचना कराव्यात. तसेच प्रत्येक जिल्ह्यात नवीन शैक्षणिक धोरणसंदर्भात बैठका घेऊन जनजागृती करावी.
महाविद्यालये व विद्यापीठांच्या क्लस्टर निर्मितीला प्रोत्साहन देण्यात राज्य पुढे आहे ही चांगली बाब आहे. नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमध्ये सुद्धा महाराष्ट्र अग्रेसर असला पाहिजे. विद्यापीठांचे विविध विषय केंद्र सरकारशी संबंधित असतात याबाबत केंद्र सरकारशी पाठपुरावा करावा. यासाठी दरमहा आपला प्रतिनिधी नवी दिल्ली येथे पाठवावा आणि नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत ज्या नवीन मार्गदर्शक सूचना असतील, त्याची अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.
तसेच या नवीन धोरणाची अंमलबजावणी करत असताना प्राध्यापकांच्या मनातील शंकांचे निरसन करावे. ज्या विद्यापीठामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार नाही, अशा विद्यापीठांवर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विद्यापीठांनी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी”