The number of new corona cases in the state has dropped by 42 per cent in the last week.
गेल्या आठवड्यात राज्यात नवे कोरोना रुग्ण आढळण्याचं प्रमाण ४२ टक्क्यांनी घसरलं.
मुंबई : कोरोनाची तिसरी लाट राज्यात ओसरताना दिसते आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण सुमारे ४२ टक्क्यांनी कमी झालं. सर्वाधिक घसरण मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात दिसून आली. १९ ते २५ जानेवारी या आठवड्याच्या तुलनेत गेल्या आठवड्यात या जिल्ह्यात नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण ६० टक्क्यांनी कमी झालं आहे. हेच प्रमाण पुण्यात ४४ टक्के, नागपूरात ३१ टक्के, नाशिकमध्ये २७ टक्के आहे.
जानेवारी महिन्यात राज्यात तब्बल १० लाख ३८ हजार ८१० नव्या रुग्णांची नोंद झाली. १ हजार ४३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा मृत्यूदर १ दशांश टक्के आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यांत हा दर अर्धा ते दीड टक्क्यांच्या दरम्यान होता. जानेवारी ३ लाखाच्या वर गेलेली राज्यातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता २ लाखापेक्षा कमी झाली आहे. २० हजाराच्या वर गेलेली मुंबईतल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता सुमारे ८०० झाली आहे.
जानवेरीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात राज्यात दररोज २ लाखाच्या आसपास कोरोना चाचण्या होत होत्या. आता हे प्रमाण दीड लाखापेक्षा कमी झालं आहे. २३ जानेवारीला २२ टक्क्यांपेक्षा जास्त असलेला राज्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर आता १० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. RTPCR चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी दर मात्र अजूनही २३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गडचिरोली, नागपूरमधला पॉझिटिव्हीटी दर ४० टक्क्यांपेक्षा जास्त तर वाशिम, औरंगाबाद, नाशिक, पुणे, वर्धा आणि अमरावतीमध्ये हा दर ३० टक्क्यांहून अधिक आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमधला पॉझिटिव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.