The forest department should take action to increase the number of vultures in the state
राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने वन विभागाने कार्यवाही करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
राज्य वन्यजीव मंडळाची २२ वी बैठक; ३१ प्रस्तावांना मान्यता
मुंबई : राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे दृष्टीने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी. तसेच जंगली म्हैस आणि लांडगा यांचेही संवर्धन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य वन्यजीव मंडळाचे उपाध्यक्ष तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे राज्य वन्यजीव मंडळाची 22 वी बैठक आज पार पाडली. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या बैठकीस
उपस्थित राहून प्रत्येक विषयावर सदस्यांसोबत चर्चा केली व आवश्यक सूचना केल्या.
या बैठकीत पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव, मेाबईल टॉवर उभारण्याचे प्रस्ताव, राष्ट्रीय महामार्गाचे प्रस्ताव, भुयारी मार्गाचा प्रस्ताव, मंदिर पायऱ्या दुरुस्तीचा प्रस्ताव, वीजवाहिनीचे प्रस्ताव, नैसर्गिक गॅस पाइप लाइनचा प्रस्ताव, पाटबंधारे नूतनीकरणाचा प्रस्ताव, खाणीचे प्रस्ताव, अशा 31 विकास प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात आली.
वन्यजीव मान्यतेची प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी उपाध्यक्ष तथा मंत्री (वने) यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची स्थायी समिती स्थापन करण्यास मंडळाने मान्यता प्रदान केली. यामुळे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्यास मदत होणार आहे.
मौजे सालेघाट (ता. पारशिवनी, जि. नागपूर) या गावाचा अंतर्भाव करुन मानसिंग देव विस्तारीत अभयारण्य घोषित करण्याबाबत मंडळाने मान्यता दिली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने वन विभागाने कार्यवाही करावी”