To inquire into the case of malpractice of registration in the office of the Sub-Registrar
दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार
– महसूल मंत्री विखे पाटील
दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ४ व हवेली क्रमांक ९ या कार्यालयामधील मागील एक वर्षातील दस्त नोंदणीची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन
मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीमध्ये गैरव्यवहार प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत चौकशी समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीत होत असलेला गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य सुनील टिंगरे, राहुल कुल यांनी उपस्थित केला होता.
महसूल मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणी दस्तांच्या तपासणीबाबत कारवाई करण्यात येत आहे. दुय्यम निबंधक हवेली क्रमांक ४ व हवेली क्रमांक ९ या कार्यालयामधील मागील एक वर्षातील दस्त नोंदणीची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. याशिवाय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाने पुणे शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयामधील मे २०२३ आणि जून २०२३ या कालावधीमध्ये नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी ९ तपासणी पथके गठित केली असून सह जिल्हा निबंधक वर्ग -१ पुणे शहर यांनी पुणे शहरातील सह दुय्यम निबंधक यांच्या हवेली क्र. ४ व हवेली क्र. ९ कार्यालयामध्ये सन २०२० पासून नोंदणी झालेल्या दस्तांची तपासणी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान दस्तनोंदणीमध्ये अनियमितता आढळून आल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणी गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करणार”