A detailed review of the development projects in the state was taken in the PMU meeting
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा घेतला सविस्तर आढावा
पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु; कामांच्या ठिकाणी नागरिकांना त्रास होऊ नये यादृष्टीने नियोजन करा
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा. विकासकामे सुरु असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यादृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या- पीएमयू) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवी मुंबईतील उलवे वसाहतीमधील सेक्टर १२ येथे केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यातील पहिला ‘युनिटी मॉल’ उभारला जात आहे. यामुळे नवी मुंबई परिसराला भविष्यातील सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचे व्यापारी केंद्र अशी ओळख मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर युनिटी मॉलचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश ‘प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या आढावा बैठकीमध्ये करावा.
पुणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो मार्गांबाबत आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मेट्रो मार्ग १, २ आणि ३ च्या कामांना गती देण्यात यावी. राजभवन येथील मेट्रो मार्गावर पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. याठिकाणी राजभवन परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टील आणि सिमेंट यांचा वापर करून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते निगडी मार्गास मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत महामेट्रो, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्यादरम्यानचा त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या कामात काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणांनुसार मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प किंमतीस केंद्रीय नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री महोदयांशी चर्चा करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कोकणाच्या पर्यटनाला चालना देणारा रेवस ते रेडी किनारा महामार्ग किनारपट्टीवरील काही गावांतून जातो. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चार मार्गिकांऐवजी दोन मार्गिका प्रस्तावित करण्याबाबत पुनर्विचार करावा. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्याकरिता स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकासाला गती द्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, इंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा सविस्तर आढावा”