Inspection of 14161 private buses by air velocity teams of the Transport Department
परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत १४१६१ खासगी बसची तपासणी
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बस मालकांकडून १ कोटी ८३ लाख रुपयांचा दंड वसूल
मुंबई : राज्य शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्याबाबत तपासणीची मोहीम राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या माध्यमातून राबविण्यात आली. या मोहिमेत १४ हजार १६१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४,२७७ खासगी बस विविध गुन्ह्यांचे उल्लंघन करताना आढळून आल्या आहेत. त्यांच्या तपासणीसाठी प्रतिवेदने निर्गमित करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई पूर्वचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
राज्य शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या- त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्य:स्थितीचे भाडेदर विचारात घेवून खासगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत.
शासनाने विहित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या खासगी कंत्राटी प्रवासी बसची व अन्य गुन्ह्यांबाबत तपासणीसाठी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना १६ मे ते ३० जून २०२३ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या मोहिमेमध्ये बसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणे, टप्पा वाहतूक, प्रवासी बसमधून अवैधरित्या मालवाहतूक, योग्यता प्रमाणपत्र वैध नसणे, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदी वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, मोटार वाहन कर भरल्याची खात्री करणे, जादा भाडे आकारणे, अग्निशमन यंत्रणा कार्यरत असणे, आपत्कालिन निर्गमन दरवाजा आणि इतर दरवाजे कार्यरत स्थितीत असल्याबाबतची तपासणी करण्यात आली.
परिवहन विभागातील सर्व परिवहन कार्यालयातील वायूवेग पथकांमार्फत ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. विशेष तपासणी मोहिमेत खासगी कंत्राटी बससंबंधी विविध गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या बसवर कारवाई करण्यात आली. राज्यभरातील सर्व कार्यालयातील वायूवेग पथकांमार्फत १४,१६१ खासगी बसची तपासणी करण्यात आली. यापैकी ४,२७७ खासगी बस या विविध गुन्ह्यांचे उल्लंघन करताना आढळल्या आहेत. यासर्व ४,२७७ दोषी बस मालकांना तपासणी प्रतिवेदने निर्गमित करुन प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तपासणी दरम्यान रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर इत्यादी गुन्ह्यांसाठी सर्वाधिक १,७०२ बस अशा प्रकारच्या गुन्हा करताना आढळून आल्या. त्यानंतर विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करुन वाहन चालविणाऱ्या ८९० बसविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. योग्यता प्रमाणपत्र वैध नसलेल्या ५७० खासगी बसवर कारवाई करण्यात आली. ५१४ बसमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे आढळून आले. मोटार वाहन कर न भरता ४८५ बस आढळून आल्या. आपत्कालिन दरवाजा कार्यरत स्थितीत नसणाऱ्या २९३ बस आढळून आल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. तसेच खासगी बसमधून अवैधरित्या व्यावसायिक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या २२७ खासगी बसवर कारवाई करण्यात आली. बसच्या आसन क्षमतापेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४७ बसवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच खासगी बसला वेग नियंत्रक बसविणे व ते कार्यरत असणे आवश्यक असताना वेग नियंत्रक नसणारी ७२ वाहने तपासणीमध्ये आढळून आली आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “परिवहन विभागाच्या वायूवेग पथकांमार्फत १४१६१ खासगी बसची तपासणी”