It is necessary to follow the values of the constitution
संविधानाच्या मूल्यांचे पालन करणे गरजेचे – डॉ. सुखदेव थोरात
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संविधान दिन साजरा
पुणे : आपला समाज आपल्या संविधानातील मूल्यांच्या विरूद्ध वागत असतो म्हणून आपली समजाव्यवस्था लोकशाहीला पूरक नाही. त्यामुळे संविधानाच्या मूल्यांचे पालन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तसेच भारतीय राज्य घटनेचे अभ्यासक डॉ. सुखदेव थोरात यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सेंटरद्वारे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. सुखदेव थोरात, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दक्षिण बाजूस असलेल्या संविधानाच्या उद्दीशिकेस पुष्पहार अर्पण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दूरदृष्टी होती. त्यांनी लोकशाही आत्मसात करतेवेळी येणाऱ्या १० अडचणी त्यावेळीच सांगितल्या होत्या. समानता, कायदा आणि प्रशासनातील समानता, नैतिकता, अल्पसंख्यांकांचे स्थान, हिंसा, इत्यांदीचे जर संविधानानुसार पालन केले नाही, तर ते आपल्यासाठी अडचणीचे ठरू शकते, असे त्यांनी सांगितले होते. सध्यस्थितीतही आपला समाज संविधानाच्या मूल्यांचे पालन करत नाही, त्यामुळे संविधानाचे मूल्य रूजविण्याची गरज आहे, असेही डॉ. थोरात यावेळी म्हणाले.
भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले असून यानिमित्त आपण संविधानातील मूल्य, विचार, संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे, असे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकार यावेळी म्हणाले. तसेच या वर्षभरात यानिमित्त विविध कार्यक्रम राबविणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थितांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन केले. संत ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे तसेच शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या निमित्त एनसीसीच्यावतीने संविधानाची माहिती देणाऱ्या पोस्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी केले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “संविधानाच्या मूल्यांचे पालन करणे गरजेचे”