Activate the WhatsApp number to register a complaint regarding fertilizer
खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा
– कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई : खत विक्रेते काही वेळेस शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचे खत घेण्यासंदर्भात सक्ती करतात किंवा अनधिकृत खते विकून फसवणूक करतात. शेतकरी गरजेपोटी अशी सक्ती मान्य करतात. खताची लिंकिंग करणाऱ्या अशा खत विक्रेत्यांविरुद्ध शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी तात्काळ व्हॉट्स ॲप क्रमांक सुरु करुन तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
कृषी निविष्ठा व गुण नियंत्रण तसेच बियाणे पुरवठ्याबाबत आज त्यांनी मंत्रालयात कृषी विभागाचा आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री. मुंडे बोलत होते. या बैठकीला अपर मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, सहसचिव गणेश पाटील, संचालक विस्तार व सेवा विकास पाटील तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सदर व्हॉट्स ॲप क्रमांकावर तक्रार केल्यावर त्यांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवण्यात येईल. तसेच संबंधित जिल्ह्यातील भरारी पथकांना संदेश जाऊन त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी तपासणी करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुंडे यांनी दिल्या.
कापूस बियाण्यांच्या बाबतीत आढावा घेताना ते म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात कापसाच्या एचटीबीटी या वाणाला केंद्र सरकार तसेच राज्य शासनाने परवानगी दिली नाही. तरीही महाराष्ट्रात या बियाण्याची विक्री होत आहे. बियाणे उत्पादनाची परवानगी देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऑनलाईन परवाना प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात यावी, तसेच बियाण्यांच्या तक्रारींबाबत ओडिशाच्या धर्तीवर सर्वसमावेशक ॲप किंवा पोर्टल तयार करण्यात यावे असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “खतासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्स ॲप क्रमांक कार्यान्वित करा”