Through ‘Abhang Ekvishi’ the thoughts of Sant Tukaram Maharaj will reach everyone
‘अभंग एकविशी’ तून संत तुकाराम महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील
– उपमुख्यमंत्री अजित पवार
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या निवडक २१ अभंगांच्या ‘अभंग एकविशी’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपू्र्वी लिहिलेल्या अभंगातून २१ अभंग निवडून ते ‘अभंग एकविशी’ पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. ‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून प्रकाशित ‘अभंग एकविशी-तुकोबारायांची’ पुस्तकामुळे संत तुकाराम महाराजांचे सत्यशोधक विचार सर्वांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुस्तकाचे प्रकाशन करताना व्यक्त केला.
‘गाथा परिवार’ आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या देवगिरी निवासस्थानी झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जगतगुरु संत तुकाराम काळाच्या पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचारांचे संत होते. त्यांच्या अभंगाना व्यावहारिकतेची जोड होती. त्यांनी सामान्य माणसाच्या जगण्यातील विचार साहित्यात मांडले. त्यांनी चारशे वर्षांपूर्वी रचलेले अभंग आजच्या आधुनिक युगातही तितकेच समर्पक, व्यवहार्य, मार्गदर्शक आहेत. संत तुकाराम महाराजांचे अभंग मानवी जीवनावरील महाभाष्य आहेत. या महाभाष्यातील 21 अभंग निवडण्याचे आणि ‘अभंग एकविशी’ पुस्तिकारुपाने प्रसिद्ध करण्याचे कठीण काम आमदार श्री. मिटकरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.
‘अभंग एकविशी- तुकोबारायांची’ पुस्तिका प्रकाशनाच्या उपक्रम प्रत्यक्षात आणल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘गाथा परिवार’ तसेच आमदार अमोल मिटकरी व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या प्रचार-प्रसारासाठी ‘गाथा परिवार’, आमदार श्री. मिटकरी आणि आपल्यापैकी अनेक जण करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा प्रयत्नांना शुभेच्छा दिल्या.
‘अभंग एकविशी’ पुस्तिकेच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांचे अंधश्रद्धा निर्मुलन, सर्वधर्मसमभावाचे, सत्यशोधक विचार, शेतकरी, कष्टकरी, सैनिक वर्गाला दिलेला संदेश, मानवी मूल्ये रुजवण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न या साऱ्या गोष्टी, शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘अभंग एकविशी’ तून संत तुकाराम महाराजांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील”