Three recovered ancient artefacts were handed over to the Archaeological Survey of India, Goa.
जप्त केलेल्या तीन पुरातन कलाकृती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, गोवा यांच्याकडे सुपूर्द.
महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केलेल्या तीन पुरातन कलाकृती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, गोवा यांच्याकडे सुपूर्द.
पणजी : गोव्यातील पणजीमधील धरोहर संग्रहालयात आयोजित एका कार्यक्रमात आज, मुंबई क्षेत्राच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने तस्करांकडून जप्त केलेल्या तीन पुरातन कलाकृती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), गोवा यांच्याकडे आज सुपूर्द केल्या. या पुरातन कलाकृती पणजी येथील धरोहर या सीमाशुल्क तसेच वस्तू आणि सेवा कर राष्ट्रीय संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
हा कार्यक्रम देशव्यापी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. देशभरात सात ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये तस्करांकडून जप्त केलेल्या अशा 101 पुरातन कलाकृती आणि हस्तलिखिते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. जप्त केलेल्या कलाकृती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवण्याच्या या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन दूरदृश्य प्रणालीमार्फत उपस्थित होत्या.
धरोहर संग्रहालयात आयोजित कार्यक्रमात, संग्रहालयाचे अधीक्षक सुनील सिंग बिष्ट यांनी या पुरातन कलाकृती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे गोवा येथील सहायक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. किशोर रघुबन्स यांच्याकडे सुपूर्द केल्या.
सीमा शुल्क विभागाने तस्करांकडून जप्त केलेल्या सर्व पुरातन वस्तू आणि कलाकृती अखेरीस भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सुपूर्द केल्या जातात, कारण हा विभागच अशा वस्तूंचे अंतिम संरक्षक आहेत, अशी माहिती या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वस्तू आणि सेवा कर तसेच सीमा शुल्क विभागाच्या पुणे क्षेत्राचे मुख्य आयुक्त मयंक कुमार यांनी दिली. “अशा अनेक कलाकृती अजूनही महसूल गुप्तचर संचालनालयाच्या ताब्यात आहेत परंतु त्यांच्या जप्तीशी संबंधित कायदेशीर कार्यवाही अद्याप सुरू असल्यामुळे त्या भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाकडे सोपवता आलेल्या नाहीत. कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अशा भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभागाकडे सोपवल्या जाऊ शकत नाहीत,” असेही ते म्हणाले.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, गोवा यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आलेल्या पुरातन वस्तू महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई शाखेने 2007 साली जप्त केल्या होत्या, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई येथील प्रधान अतिरिक्त महासंचालक सुनील कुमार मल्ल यांनी दिली. जप्त केलेल्या वस्तूंशी संबंधित कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या सर्व बाबी लक्षात घेऊन धरोहर संग्रहालयात प्रदर्शनात मांडण्यासाठी या पुरातन वस्तू गोव्यात आणण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. शिवाय, हे सीमाशुल्क तसेच वस्तू आणि सेवा कर राष्ट्रीय संग्रहालय देखील आहे, यांचा उल्लेख त्यांनी केला.
या पुरातन वस्तू भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या असल्या तरीही त्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी धरोहर संग्रहालयातच ठेवल्या जातील, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, गोवा येथील सहायक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ किशोर रघुबन्स यांनी सांगितले.
या कार्यक्रमात गोव्यातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयातील आयुक्त बिपीन कुमार उपाध्याय हे देखील यावेळी उपस्थित होते.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे सोपविण्यात आलेल्या तीन पुरातन कलाकृती
1.उमा-महेश्वर
ही उमा-महेश्वराची बसलेल्या मुद्रेतील मूर्ती आहे. शिव आणि पार्वती या दोघांनीही मुकुट परिधान केलेले यामध्ये चित्रित केलेले आहे. या कलाकृतीत पार्वतीला दोन हात असून एका हाताने शिवाला मिठी मारली आहे तर दुसऱ्या हातात आरसा धरला आहे.
चार हात असलेले शिव कमळावर विराजमान आहेत आणि पार्वती त्यांच्या मांडीवर बसलेली आहे. शिवाच्या वरच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे आणि वरच्या डाव्या हातात त्रिशूल आहे. त्याचे इतर दोन हात त्याच्या पत्नीला मिठी मारताना दाखवले आहेत. शिवाचा उजवा पाय नंदीवर आणि पार्वतीचा डावा पाय वाघावर विसावलेला आहे. कमलासनाच्या खाली दोन आकृत्या प्रार्थनामय मुद्रेत दाखवल्या आहेत तर वर दोन उडणारे गंधर्व दाखवले आहेत.
महसूल गुप्तचर संचालनालयाने 18.03.2007 रोजी मुंबई विमानतळावर ही पुरातन कलाकृती ताब्यात घेतली होती. ही कलाकृती कुरिअरद्वारे सिंगापूरला ‘गृह सजावटीची वस्तू’ असे वर्णन करून निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता.
2. आठ हातांचा गणपती
ही नर्तक मुद्रेतील आठ हात असलेली गणपतीची मूर्ती आहे. त्याचे वैश्विक नृत्य सृष्टीची रचना आणि विनाशाच्या शाश्वत चक्राशी संबंधित आहे, ज्याला संसार असे म्हटले जाते, आणि संसारच विश्वाची व्याख्या करतो आणि मानव संसारापासून मुक्तीची कामना करतो.
या कलाकृतीत दुहेरी स्तरात दाखवण्यात आलेल्या पंच रथच्या वर ठेवलेल्या पद्मपीठावर श्री गणेशाचे पाय विसावलेले आहेत. त्याने जटामुकुट, हार आणि इतर दागिने परिधान केले आहेत. त्याच्या उजव्या खांद्याजवळ एक लहानसा साप देखील दर्शविला आहे. अभय मुद्रा, परसू, गजहस्त, मूलका आणि मोदक पात्र यांसारखी गणेशाची इतर काही वैशिष्ट्ये देखील ओळखली जाऊ शकतात.
ही पुरातन कलाकृती 18.03.2007 रोजी मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाद्वारे जप्त करण्यात आले होती. ही कलाकृती कुरिअरद्वारे सिंगापूरला ‘गृह सजावटीची वस्तू’ असे वर्णन करून निर्यात करण्याचा प्रयत्न केला जात होता.
3.देवी पार्वती तिच्या गणेश आणि कार्तिकेयन या पुत्रांसह.
ही चार भूजाधारी देवी ललितेची मूर्ती आहे. देवी पार्वतीच्या रूपांपैकी एक रुप ललिता आहे. पार्वतीच्या या रूपाची प्रामुख्याने पूर्व भारतात पूजा केली जाते. पार्वतीच्या या रूपाची ब्रह्मांड पुराण, देवी भागवत पुराण, अग्नि पुराण आणि पद्म पुराणात अनेक प्रकारे स्तुती केलेली आढळते.
समपद मुद्रेत सप्त रथाच्या पीठावर ठेवलेल्या दुहेरी पाकळ्या असलेल्या कमळाच्या आसनावर ही देवता उभी आहे. तिने तिच्या वरच्या उजव्या हातात अंजनाची कांडी धरली आहे आणि तिने खालचा उजवा हात तळहातावर फळ दर्शवणाऱ्या वरद मुद्रेत ठेवला आहे. वरच्या डाव्या हातात आरसा आहे तर खालचा डावा हात कार्तिकेयाच्या डोक्यावर आहे. ती अलंकार आणि उपविता यांनी विपुल प्रमाणात सजलेली आहे. तीने जटामुकुटाची केशभूषा केलेली आहे. ही प्रतिमा शांत उदात्ततेसह एक सुंदर हसरा चेहरा धारण करते आहे.
या देवतेच्या दोन्ही बाजूला तिचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय आहेत. गणेशाने उजव्या हातात परसू आणि डाव्या हातात मोदकपात्र धारण केले आहे, तर कार्तिकेयाने उजव्या हातात वाण आणि डाव्या हातात कात्यावलंबित मुद्रा आहे.
ही पुरातन कलाकृती 2007 मध्ये मुंबईतील चकाला येथे एका कुरिअर कंपनीच्या परिसरातून महसूल गुप्तचर संचालनालयाद्वारे जप्त करण्यात आली होती. ही मूर्ती हवाई मार्गाने देशाबाहेर नेण्याचे प्रयत्न सुरू होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “जप्त केलेल्या तीन पुरातन कलाकृती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, गोवा यांच्याकडे सुपूर्द.”