Toll-free mental health helpline launched for students
विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक टोल फ्री हेल्पलाईन सुरु
14499 ही विनामूल्य मानसिक आरोग्य विषयक “संवाद” हेल्पलाईन सुरू
मुंबई : सध्याची बदलती जीवनशैली, शिक्षण आणि अभ्यासक्रमाची भीती, पालकांचा दबाव तसेच वाढती स्पर्धा यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ताण- तणाव वाढत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊन आत्महत्येसाठी प्रवृत्त होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली आहे. राज्यातील सर्व शासकीय व अभिमत वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने 14499 ही विनामूल्य मानसिक आरोग्य विषयक “संवाद” हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
या हेल्पलाईनचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुंबई दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थी तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बदलती अभ्यास पद्धती, वाढता ताण- तणाव या सर्व गोष्टींचा खेळीमेळीच्या वातावरणात सामना केला पाहिजे. तसेच कोणत्याही बदलांना सहजपणे सामोरे जायला हवे, असे श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले. तसेच, सदर हेल्पलाईनबाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्याच्या व हेल्पलाईन क्रमांक वैद्यकीय महाविद्यालयांच्या दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व खाजगी महाविद्यालये यांच्या अधिष्ठाता यांना मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक गोष्टींमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नैराश्य निर्माण होत आहे. यासाठी टोल फ्री हेल्पलाईन सारखा उपक्रम नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वासही या प्रसंगी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विभागाच्या सचिव डॉ.अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक अजय चंदनवाले तसेच विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे येथून सुरु करण्यात आलेल्या या हेल्पलाईनमध्ये तज्ञ मनुष्यबळामार्फत मानसिक आरोग्यविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच उपचार करण्यात येणार आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्यविषयक टोल फ्री हेल्पलाईन सुरु”