Strict action will be taken against unauthorized lottery, bogus vendors
अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार
– उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार यांनी दिले.
राज्य लॉटरीच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, उपसचिव मनीषा कामठे, राज्य लॉटरी विक्रेता अध्यक्ष विलास सातार्डेकर यांच्यासह लॉटरी विक्रेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, राज्याचा महसूल वाढावा, नागरिकांचा लॉटरीवर विश्वास राहण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट विक्री सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
सध्या सण, उत्सवाचे दिवस असल्याने लॉटरीला पोषक वातावरण आहे. यामुळे विशिष्ट प्रमाणात तिकीट विक्री झाल्यास बक्षिसावर हमी देण्याबाबतही चर्चा झाली. लॉटरीचा प्रचार, प्रसार होण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी लॉटरीची जाहिरात करावी. परराज्यातील विक्रेत्यांकडील लॉटरीविषयी कराबाबतची थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्या.
अपर मुख्य सचिव श्री. सिंह यांनी सांगितले की, एनआयसीच्या माध्यमातून ऑनलाईन लॉटरी करण्याबाबत प्लॅटफॉर्म तयार करून ऑनलाईन लॉटरी तिकीट विक्री करण्यात येणार आहे.
श्रीमती देशभ्रतार यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीबाबत माहिती दिली. यावेळी लॉटरी विक्रेते यांनी मांडलेल्या समस्यांवरही चर्चा करण्यात आली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार”