Union Health Minister inaugurates 2 new departments of International Population Science Institute
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या २ नव्या विभागांचं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई: केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या २ नवीन विभाग आणि केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार ही उपस्थित होत्या.
सर्वेक्षण संशोधन आणि डेटा विश्लेषक तसंच कुटुंब आणि पिढ्या याविषयासंबंधीचे हे विभाग असून लोकसंख्या शास्त्र आणि वृद्धत्वाचा अभ्यास यावर २ केंद्र काम करतील. मुली, स्त्रिया, ज्येष्ठांच्या कल्याणावर या केंद्रांचा भर असेल. डेटा संकलन करण्याच्या नव्या पद्धती विकसित करण्याचं काम इथे केलं जाईल तर अन्य केंद्रात बालपण, तारुण्यावस्था, प्रौढत्व, वृद्धत्व या काळात जीवनात होणारे बदल यावर अभ्यास होईल.
दुसऱ्या केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसमोर असलेल्या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक समस्यांची शास्त्रोक्त माहिती संकलित केली जाईल. केंद्र सरकार नागरिकांसाठी आखत असलेल्या नव्या धोरणांसाठी त्याचा उपयोग होऊ शकेल.