University of Health Sciences has set an example in the country regarding offline exams – Governor Bhagat Singh Koshyari
ऑफलाईन परीक्षेबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षान्त समारंभ
नाशिक : ऑफलाईन परीक्षेबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षान्त समारंभप्रसंगी केले.
विद्यापीठाच्या ऑनलाईन दीक्षान्त समारंभ कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षेतखाली झाला. या कार्यक्रमास सन्माननीय अतिथी म्हणून प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री. श्री. अमित देशमुख तसेच सन्माननीय अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक तथा केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा.डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प्र. कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
दीक्षान्त समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी म्हणाले, कोविड-19 च्या काळात आरोग्य विद्यापीठाने उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे.
या परिस्थितीत ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावर आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र असावे. आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पना पुढे येत असून याबाबत समतोल राखण्याकरिता समाजाच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रगती साध्य करावी. तसेच समाजाच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन भरीव कार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा
– वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. अमित देशमुख म्हणाले, विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी वैद्यकीय महाविद्यालयाचा लवकरच प्रारंभ होणार आहे. आरोग्य शिक्षण व संशोधनासाठी आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांचा समावेश असलेल्या ‘इंटीग्रेटेड मेडिकल कॉम्प्लेक्स’ चा समावेश यात करण्यात यावा. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पुढील वर्षी विद्यापीठ स्थापनेचा रौप्य महोत्सव हा विलक्षण योग जुळून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्या रशिया व युक्रेन या देशांतील युध्दामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सहाय्य करण्यासाठी राज्य शासन व पंतप्रधान यांच्याशी राज्यपाल यांच्यामार्फत चर्चा करण्यात येईल. यासंदर्भात विद्यापीठाने पुढाकार घ्यावा व परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी संशोधनपर अहवाल सादर करावा. विद्यापीठाने कुलगुरु यांच्या निर्देशानुसार ‘व्हिजन डॉक्युमेंट’ उपक्रम अंतर्गत कार्य करावे. ज्ञान हे बदलासाठी शक्तीशाली साधन आहे. समाजाच्या विकास व कल्याणासाठी ज्ञानाची निर्मिती व उपयोजन महत्वपूर्ण आहे. राष्ट्र बांधणीच्या प्रक्रियेत आरोग्य क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
या दीक्षान्त समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 513, दंत विद्याशाखा पदवीचे 2041, आयुर्वेद विद्याशाखेचे 1021, युनानी विद्याशाखेचे 70, होमिओपॅथी विद्याशाखेचे 936, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 1744, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 336, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 150, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 14, बी.ए.एस.एल.पी. विद्याशाखेचे 31, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 06 विद्यार्थ्यांना तसेच पदव्युत्तर विद्याशाखेतील एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 2141, पी. जी. दंत 461, पी.जी. आयुर्वेद 93, पी.जी. होमिओपॅथी 53, पी.जी. युनानी 04, पी.जी. डी.एम.एल.टी. 78, पॅरामेडिकल 104, पी.जी. अलाईड (तत्सम) 272 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या समारंभास विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. दीक्षान्त समारंभ ऑनलाईन कार्यक्रमास विविध प्राधिकरण सदस्य, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पालक ऑनलाईन उपस्थित होते.