Deputy Chief Minister Ajit Pawar inspected various development works in the city
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी
प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा-अजित पवार
पुणे : प्रशासकीय इमारतीचे कामे करतांना आगामी १०० वर्ष टिकणारी दर्जेदार कामे करा, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी प्रसंगी दिले.
यावेळी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक नंदकुमार काटकर, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, ‘सीईओपी’चे उपकुलगुरु सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, निबंधक दयाराम सोनवणे आदी उपस्थित होते.
‘नोंदणी भवन’ येथील विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली.
‘नोंदणी भवन’ची कामे करतांना प्रामुख्याने वीज, वाहनतळ, सोलरपॅनल, जिन्यामधील अंतर, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. भवनच्या दर्शनी भागात विभागाचे मोठ्या आकाराचे बोधचिन्ह लावावे. भिंतीच्या कामासाठी मजबूत विटेचा वापर करावा. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा जपून कामे करावीत. इमारतीसाठी टिकाऊ दगडाचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही विचार करण्यात यावा. माजी विद्यार्थ्यांच्या कल्पना, सूचनांचा विचार करा,अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.
इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी इमारत परिसरातील विविध इमारत आणि प्रयोगशाळेची पाहणी करुन संबंधित विभाग प्रमुखाकडून येथील कामांबाबत माहिती घेतली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शहरातील विविध विकास कामांची पाहणी”