Film screening of NFDC-NFAI archive of veteran actress Waheeda Rehman
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या एनएफडीसी-एनएफएआय संग्रहित चित्रपटांचे प्रदर्शन
‘गाईड’, ‘बीस साल बाद’, ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ चित्रपटांचा आनंद घेण्याची संधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराची घोषणा झाली होती.
या प्रसंगाचे औचित्य साधून औचित्य साधून राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफडीसी-एनएफएआय) यांच्या मार्फत ‘वहिदा रहमान रेट्रोस्पेक्टिव्ह’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्लीच्या महादेव मार्ग येथील फिल्म डिव्हिजन ऑडिटोरियम येथे 18 ते 21 ऑक्टोबर रोजी दररोज सायंकाळी 6 वाजता या चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात येईल. यामध्ये बुधवार, 18 ऑक्टोबर रोजी गाईड (1965), गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी बीस साल बाद (1962), शुक्रवार, 20 ऑक्टोबर रोजी प्यासा (1957), तर शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी कागज के फूल (1959) या चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर प्रवेशिकांचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, या चारही चित्रपटांचे संग्रह एनएफडीसी-एनएफएआय यांच्यामार्फत करण्यात आले आहे. यामध्ये गाईड आणि बीस साल बाद हे चित्रपट आजच्या काळात लोकप्रिय असलेल्या 4K रिझोल्यूशन स्वरुपात तर प्यासा आणि कागज के फूल हे चित्रपट 2K स्वरुपात आणण्यात आले आहेत.
एनएफडीसी-एनएफएआय या संस्था केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने निर्माण करण्यात आलेल्या आहेत. याअंतर्गत भारतीय चित्रपट सृष्टीतील वारशाचे जतन, संवर्धन आणि त्याला चालना देण्याचे कार्य करण्यात येते.
यंदा दाखवण्यात येत असलेल्या चित्रपटांच्या प्रिंट्सचे जतन एनएफडीसी-एनएफएआयच्या संग्रहालयात विशिष्ट तापमानात व नियंत्रित वातावरणात गेल्या कित्येक दशकांपासून करण्यात आले होते.
जुन्या पद्धतीने रिळांच्या स्वरुपात उपलब्ध असलेल्या चित्रपटांना सध्याच्या 4K स्वरुपात रुपांतरीत करण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागला. त्यांचे योग्य प्रकारे जतन केलेले असल्यामुळेच त्यांना आजच्या काळातील 4K स्वरुपात आणणे शक्य झाले आहे.
चित्रपटाला 4K स्वरुपात आणण्यासाठी काही महत्त्वाच्या टप्प्यातून जावे लागते. यामध्ये प्रत्येक फ्रेमवरील धूळ, घाण, डाग, चिरा आदी तंत्रज्ञानाच्या मदतीने हटवण्यात येतात. यादरम्यान चित्रपटाच्या रंगसंगती आणि आवाज यांचाही विचार करण्यात येत असतो. एका तीन तासाच्या चित्रपटात अडीच लाखांपेक्षाही जास्त फ्रेम असतात. त्यामुळे हे काम अत्यंत लक्षपूर्वक करणे आवश्यक असते.
अशा प्रकारे, रुपांतरण पूर्ण झालेल्या चित्रपटाची अंतिम आवृत्ती प्रेक्षकांना अतिशय नवा अनुभव देते. चित्रपट जणू काही नव्यानेच चित्रीत करण्यात आला आहे, याचा आभास यामुळे निर्माण होतो.
सद्यस्थितीत अशा प्रकारे 4k स्वरुपात रुपांतरित करण्यात आलेले दर्जेदार चित्रपट देशात इतर कोणत्याही संस्थांकडे उपलब्ध नसून त्यांचा आनंद घेण्याची संधी प्रेक्षकांना या निमित्ताने मिळाली आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन एनएफडीसी-एनएफएआयने केले आहे. अधिक माहितीसाठी एनएफडीसीच्या सोशल मीडिया पेजवर भेट द्यावी.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या एनएफडीसी-एनएफएआय संग्रहित चित्रपटांचे प्रदर्शन”