Veteran Kirtanist Baba Maharaj Satarkar Passed Away
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांचं निधन
घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नेरुळच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून उद्या संध्याकाळी चार वाजता नेरुळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली ह. भ. प. भगवती महाराज व रासेश्वरी सोनकर आणि नातवंडे असा परिवार आहे.
बाबमहाराज सातारकर याचं पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे- सातारकर असं होतं. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्याच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात झाला. त्यांनी वकिलीचं शिक्षण घेतलं होतं. त्यांच्या घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा चालत आली होती. बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं.
वारकरी संप्रदायातला प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचं नाव घेतलं जात असे. १९६२ साली आप्पा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर सातारकर घराण्याची कीर्तन-प्रवचन परंपरा बाबा महाराज सातारकर यांनी पुढे चालू ठेवली.
गोड गळा, रसाळ वाणी आणि प्रचंड व्यासंग ही त्यांच्या कथन शैलीची वैशिष्ट्यं होती. बाबामहाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं.
बाबामहाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर इत्यादी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते. बाबा महाराज सातारकर यांच्या धार्मिक कार्यात त्यांच्या पत्नी रुक्मिणी उर्फ माईसाहेब यांचीही मोलाची साथ होती.
वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान साध्या सोप्या शब्दात सांगण्याची त्यांची हातोटी लोकप्रिय ठरली. १९८३ साली त्यांनी ‘श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था’ स्थापना केली. तसंच व्यसनमुक्तीची चळवळ चालवली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत धर्म आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, बाबा महाराजांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती. त्यांनी कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भागवत विचार सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेणारा अमोघ वाणीचा कीर्तनकार हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, वारकरी विचार आणि भागवत धर्म सर्वदूर नेण्यात एक कीर्तनकार म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले. आवाजातील प्रेमळ आणि आश्वासक भाव तसेच उत्कृष्ट वक्तृत्व यामुळे त्यांच्या कीर्तन-प्रवचनांमध्ये श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यातून मोठा चाहता वर्ग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर निर्माण केला. राज्य सरकारने नुकताच ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार त्यांना दिला होता. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, संत अभ्यासक आपल्यातून निघून गेले आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबियांच्या आणि लाखो भाविकांच्या दुःखात मी सहभागी आहे.
बाबा महाराजांनी विठ्ठलभक्ती, वारकरी सांप्रदायचा वारसा पुढे नेला – उपमुख्यमंत्री अजित पवार
ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
“ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्राची विठ्ठल, ज्ञानेश्वर भक्तीची परंपरा, वारकरी सांप्रदायाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. साध्या, सोप्या, रसाळ, ओघवत्या वाणीतल्या कीर्तनांनी महाराष्ट्राचे प्रबोधन केले. प्रबोधनाच्या चळवळीतून अज्ञान, अनीती, अंधश्रद्धेसारख्या कुप्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांच्या किर्तनांनी व्यसनमुक्तीच्या लढ्याला बळ दिले.
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात बाबा महाराजांचे स्वतंत्र स्थान होते. त्यांचे निधन महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी आहे. बाबा महाराजांच्या कुटुंबियांच्या, अनुयायांच्या दु:खात आम्ही सर्व सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या रसाळ वाणीने समाज प्रबोधन करणारे चक्रवर्ती संत हरपले
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी केले दुःख व्यक्त
आपल्या मधुर व रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करत कीर्तन परंपरेची ख्याती जगभरात पोहोचवलेले ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने राज्यातील एक चक्रवर्ती संत हरपले आहेत, अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
बाबा महाराजांनी कायमच आपल्या सुमधुर वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने राज्यातील एक महान विभूती, एक चक्रवर्ती संत हरवले असल्याची भावना मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली असून, त्यांच्या स्मृतीस श्री. मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ. प. बाबामहाराज सातारकर यांचं निधन”