Veteran Marathi actor Ravindra Mahajani passed away
ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन
रवींद्र महाजनी यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे : ज्येष्ठ मराठी अभिनेते रविंद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. पुण्याजवळील आंबी परिसरात राहत्या घरी पोलिसांना काल त्यांचा मृतदेह आढळला असून गेले 2 दिवस त्यांच्या घराचं दार बंद असल्यानं पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. अधिक तपशिलाची प्रतीक्षा आहे.
रविंद्र महाजनी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या 1975 मधील मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार हे चित्रपट विशेष गाजले. महाजनी यांनी 1997 यावर्षी – सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. ज्येष्ठ अभिनेता रवींद्र महाजनी यांचं निधन/ अनेक मान्यवरांनी व्यक्त केलं तीव्र दुःख केलं.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मुख्यमंत्र्यांना दुःख
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
रवींद्र महाजनी यांच्या निधनाने एक रुबाबदार अभिनेता गमावला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात, महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांना आणि त्यांच्या अभिनयाला देखणा हे विशेषण शोभून दिसयाचे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद त्यांना मिळो, हीच प्रार्थना.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांचे निधन ही मराठी कलासृष्टीची मोठी हानी आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले
आपल्या कसदार अभिनयाचा अमिट ठसा मराठी सिनेसृष्टीवर उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी मराठी चित्रपट रसिकांच्या मनांत कायम अजरामर राहतील अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रवींद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
रवींद्र महाजनी यांची ‘एक्झिट’ वेदनादायी : सुधीर मुनगंटीवार
‘‘झुंज’ या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, अशी शोकभावना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात ‘चॉकलेट हिरो’ म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.
रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मी या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
रविंद्र महाजनी यांचे निधन सर्वांसाठी वेदनादायी
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली. मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रविंद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. ‘देवता’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘खेळ कुणाला दैवाचा कळला?’ या ओळींची आज प्रत्यक्षात अनुभूती होत आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. मुंबईचा फौजदार चित्रपटाद्वारे ते प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलेच नाही. देवता चित्रपटात ‘दैवलेख ना कधी कुणा टळला, खेळ कुणाला दैवाचा कळला?’ याचा अनुभव प्रत्येकाच्या जीवनात येतो, हे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील रुबाबदार आणि अष्टपैलू अभिनेत्याला आपण मुकलो आहोत. रविंद्रजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केल्या आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन”