Barty will set up a hall of 300 book stalls on the day of Vijaystambha salutation
विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टाॕलचे दालन
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजीच्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांना प्रशासनाच्यावतीने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर बार्टीतर्फे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून वाचन प्रेमींसाठी ३०० पुस्तक स्टाॕल उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांनी दिली.
श्री.वारे , विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी प्रशासनाच्यावतीने अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. येणाऱ्या अनुयायांच्या अभिवादनाचे नियोजन, प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा, पार्किंगचे नियोजन, अनुयायांना विश्रांतीसाठी निवारा इत्यादींचा आढावा घेतला.
बार्टीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त विजयस्तंभच्या पाठीमागील भव्य जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तकाचे दालन अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अंतर्गत रस्ते, बॅरीगेट, प्रसिद्धी माध्यमांची स्वतंत्र व्यवस्था, भिखु संघ, समता सैनिक दल , महार रेजिमेंटची मानवंदना, हिरकणी कक्ष, पोलिस मदत व नियंत्रण कक्ष, पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था, स्वच्छतेचे नियोजन आदी सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि भिमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com