Vikasit Bharat Sankalp Yatra is a resolution to make a prosperous Maharashtra
विकसित भारत संकल्प यात्रा हा समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प
-राज्यपाल रमेश बैस
पुणे : देशाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचणे गरजेचे असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर असा प्रयत्न करण्यात येत आहे. हा उपक्रम सामाजिक न्यायावर आधारीत समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत मावळ येथील कान्हे गावात आयोजित महाशिबीराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलीस उप अधीक्षक सत्यसाई कार्तिक, उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जामसिंग गिरासे, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, सरपंच विजय सातकर उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य शासन एकत्रितपणे नागरिकांना शिक्षण आणि कौशल्याद्वारे सक्षम बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद करून श्री.बैस म्हणाले, नागरिकांना स्वच्छता सुविधा, आवश्यक वित्तीय सेवा, वीज जोडणी, गॅस सिलेंडर सुविधा, गरीबांना हक्काचे घर, खाद्य सुरक्षा, उपयुक्त पोषण, आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी यासारख्या शासनाच्या योजनांचा लाभ देणे हा विकसित भारत संकल्प यात्रेचा भर आहे. या सुविधांपासून वंचित असलेल्यांपर्यंत पोहोचणे हा यात्रेचा उद्देश आहे. यात्रेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले आहे. लोकसहभागाद्वारे ही यात्रा यशस्वी होऊन पात्र लाभार्थ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
राज्यपाल म्हणाले, यावर्षी ग्रामीण भाग आणि आदिवासी समाजाच्या विकासावर शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दीष्ट गाठण्यासाठी समाजातील वंचित घटकांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून असा प्रयत्न होत आहे.
विकसित भारत हे देशातील सर्वात मोठ्या संपर्क अभियानापैकी एक आहे. २ लाख ५५ हजार ग्रामपंचायत आणि ३ हजार ६०० शहरांमधून या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनांसंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम या यात्रेद्वारे होत असल्याचे श्री.बैस म्हणाले.
मावळ तालुक्यात लेण्या, किल्ले, सिंचन प्रकल्प, घाट रस्ते आणि मोठ्या प्रमाणात फुलशेती असल्याने पर्यटन विकासाला खूप वाव आहे. पुण्याशी जोडले गेल्याने या परिसराचे शहरीकरणही वेगाने होत आहे, असेही राज्यपाल म्हणाले.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात फिरुन केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या ‘आपला भारत, विकसित भारत’ या चित्ररथाला राज्यपालांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरुपात २० लाभार्थ्यांना विविध योजनांच्या लाभाचे वाटप राज्यपाल श्री.बैस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलला राज्यपालांनी भेट दिली आणि उपस्थितांशी संवाद साधला.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “विकसित भारत संकल्प यात्रा हा समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प”