Voter awareness programs should be combined with youth festival activities
युवा महोत्सवातील उपक्रमांशी मतदार जनजागृती कार्यक्रमाची सांगड घालावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवात युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती उपक्रमांची जिल्हास्तर युवा महोत्सवाशी सांगड घालावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
युवा महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस स्वीपच्या नोडल अधिकारी अर्चना तांबे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे तंत्र अधिकारी राजेंद्र डुंबरे, नेहरु युवा केंद्राचे निवृत्त उपसंचालक यशवंत मानखेडकर यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा युवा महोत्सवाच्या अनुषंगाने महाविद्यालयांमध्ये विविध सांस्कृतिक, कौशल्य विकास, संकल्पना आधारित व कृती आधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष घोषित केल्यामुळे राज्यासाठी संकल्पना आधारित स्पर्धेसाठी ‘तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर’ आणि ‘सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान’ ही संकल्पना दिलेली असून त्याबरोबर निवडणूकांमध्ये युवा वर्गाच्या सहभागाचे महत्व अशा विषयाचाही समावेश करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
जिल्हा युवा महोत्सव हा डिसेंबरच्या प्रारंभी आयोजित करण्याचे प्रस्तावित असल्याचे श्री. कसगावडे यांनी सांगितले. सांस्कृतिक बाबीअंतर्गत समूह लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक एकल लोकनृत्य, एकल लोकगीत, कौशल्य विकास अंतर्गत कथालेखन, पोस्टर स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, युवा कृती अंतर्गत हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादने आदी स्पर्धा घेतल्या जाणार असून त्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय रोख पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.
या स्पर्धांच्या आयोजनासाठी महाविद्यालयांशी समन्वय साधण्याचे काम सुरू असून जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवांचा सहभाग लाभेल यासाठी प्रयत्न असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “युवा महोत्सवातील उपक्रमांशी मतदार जनजागृती कार्यक्रमाची सांगड घालावी”