Winter Session of Parliament adjourned
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे
नवी दिल्ली: संसदेचं हिवाळी अधिवेशन आज गदारोळातच संस्थगित झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एका वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी लोकसभेत मोठा गोंधळ घातला. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना शिस्त पाळण्याचं आणि संसद भवन परिसरात आंदोलन न करण्याचं आवाहन केलं. मात्र, निर्देशांची अंमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
संसदचं पावित्र्य टिकवणं ही सर्व सदस्यांची जबाबदारी असल्याचं ओम बिर्ला यांनी अधोरेखित केलं. याच गोंधळात कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावरच्या दोन महत्त्वाच्या विधेयकांना संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. या समितीत लोकसभेचे २७ आणि राज्यसभेचे १२ सदस्य सहभागी असतील.
समितीमध्ये भाजपचे अनुराग ठाकूर, परषोत्तम रुपाला, काँग्रेसच्या प्रियंका गांधी आणि मनीष तिवारी, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे.
यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याचं जाहीर करण्यात आलं.
राज्यसभेतही गोंधळ
राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावरही सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दोन्ही बाजूंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या विश्वासाचा सन्मान केला पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, गोंधळ न थांबल्यानं सुरुवातीला कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही गोंधळ सुरू राहिला. या परिस्थितीतच ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. अखेर, राज्यसभेचं कामकाजही अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं, अशी घोषणा अध्यक्ष धनखड यांनी केली.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
हे ही अवश्य वाचा
One Comment on “संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित”