Discussion on Women’s Reservation Bill begins in Lok Sabha
‘महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु
महिला सक्षमीकरण हा अनेक पक्षांसाठी राजकीय मुद्दा असू शकतो परंतु भाजपसाठी नाही: गृहमंत्री अमित शहा
नवी दिल्ली : लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयक विचारार्थ आणि पारित करण्यात आले. महिलांना लोकसभा, आणि राज्यांच्या विधानसभांमधे एक तृतियांश आरक्षणाची तरतूद करण्यासाठी राज्यघटनेत १२८ वी दुरुस्ती करणाऱ्या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. नवीन संसदभवनात कामकाजाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल हे नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक सादर केलं.
काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी या चर्चेत सहभागी होत, महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचं समर्थन असल्याचं सांगितलं. या विधेयकाच्या अंमलबजावणीत विलंब झाल्यास तो भारतीय महिला वर्गाचा अपमान ठरेल असं त्या म्हणाल्या. हे विधेयक तात्काळ अंमलात आणावं, मात्र यासोबतच जातनिहाय जनगणना करुन इतर मागासवर्ग आणि अनुसूचित जातीच्या महिलांना संधी द्यावी, अशी मागणी गांधी यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनीही अशीच मागणी केली. या विधेयकाची १५ वर्षांची मर्यादा काढून टाकण्याची मागणी द्रविड मुनेत्र कळघमच्या कनिमोळी यांनी केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अनुप्रिया पटेल, भाजपाचे निशिकांत दुबे, तृणमूल काँग्रेसच्या काकोली घोष, वायएसआर काँग्रेस पक्षाच्या गीता वांगा, संयुक्त जनता दलाचे राजीव रंजन सिंग, बीजेडीच्या राजश्री मलिक, शिवसेनेच्या भावना गवळी यांनी या चर्चेत भाग घेतला.
गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेला सहभाग घेतला. महिला आरक्षण विधेयक ही महिलावर्गाच्या अधिकारासाठी मोठी लढाई असल्याचं त्यांनी सांगितलं. हे विधेयक म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेला नारीशक्तीचा सन्मान ठरेल, या विधेयकामुळं महिला अधिक सक्षम होतील, असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. शहा म्हणाले की, महिला सक्षमीकरण हा अनेक पक्षांसाठी राजकीय मुद्दा असू शकतो परंतु भाजपसाठी हा राजकीय मुद्दा नसून भाजपची कार्यसंस्कृती आहे.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झाल्यापासून सुरक्षा, सन्मान आणि महिलांचा सहभाग हे सरकारचे केंद्रस्थान राहिले आहे. जन धन खात्याचे उदाहरण देताना ते म्हणाले, ७० टक्के खातेदार महिला आहेत. ते म्हणाले, देशभरात 11 कोटी 72 लाख शौचालये बनवण्यात आली ज्यामुळे महिलांचे सक्षमीकरण सुनिश्चित झाले. श्री. शहा म्हणाले, महिलांसाठी तीन कोटी घरे बांधण्यात आली असून 12 कोटी घरांना नळ जोडणी देण्यात आली आहे. ते म्हणाले, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत तीन कोटी महिलांना लाभ झाला आहे.
भाजप खासदार डॉ.निशिकांत दुबे म्हणाले, या विधेयकातील तरतुदी निश्चितपणे लागू होतील. काँग्रेस पक्षाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, जनगणना आणि परिसीमन करण्यात येईल आणि त्यानुसार महिलांना आरक्षण दिले जाईल.
केंद्रीय मंत्री आणि अपना दल खासदार अनुप्रिया पटेल म्हणाल्या की, आज लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व १४ टक्के आणि राज्यसभेत ११ टक्के आहे, हे दुर्दैवी आहे. त्या म्हणाल्या, लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी हे विधेयक महत्त्वाचे पाऊल आहे.
भाजपच्या जगदंबिका पाल यांनी या विधेयकाला ऐतिहासिक असे म्हटले आहे की, या विधेयकामुळे धोरणनिर्मिती आणि प्रशासनात महिलांचे प्रतिनिधित्व वाढेल. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की काँग्रेसने महिला कोट्याचा प्रस्ताव 15 वर्षांपेक्षा जास्त नसावा, परंतु भाजप महिलांसाठी जागा राखून ठेवण्याची हमी देते. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांनी विरोधी पक्ष महिला आरक्षण विधेयकावर राजकारण करत असल्याचा आरोप केला.
वायएसआर काँग्रेसच्या गीता विश्वनाथ वनगा, बीजेडीच्या राजश्री मल्लिक, बसपाच्या संगीता आझाद, बीआरएसच्या नामा नागेश्वरा राव, शिवसेनेच्या भावना गवळी, भाजपच्या जसकौर मीना, सीपीआयचे के. सुब्बारायन, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आदींनीही भाषणे केली.
राज्यसभेत चांद्रयान-३ मोहिमेविषयी चर्चा सुरु झाली. अंतराळविज्ञान क्षेत्रात देशाच्या कामगिरीचा आढावा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी चर्चेला सुरुवात करताना मांडला. या मोहिमेच्या यशाबद्दल सभागृहात अभिनंदन करण्यात आलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “‘महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु”